Showing posts with label रसग्रहण-कविता. Show all posts
Showing posts with label रसग्रहण-कविता. Show all posts

Wednesday, 28 December 2016

गायी पाण्यावर काय म्हणुन आल्या

(कविता  रसग्रहण) 

हि कविता खूप लहान असल्यापासून माझी आवडती आहे, जसं वय वाढत गेलं तशी ती आणखीन अधिक आवडू लागली. हि कविता आवडण्याचं मागचं कारण लहानपणी बघितलेली आमची गरिबी, चार मुलांचं शिक्षण करताना आईवडिलांची झालेली ओढाताण हे सगळं असावं.

कवी बी यांची कविता आहे ही, त्यांचं खरं नाव नारायण मुरलीधर गुप्ता असं आहे. हि कविता खूप सरळ सोप्या नी साध्या थीमवर लिहिलेली आहे. गरीब बाप आपल्या मुलीची समजूत काढत आहे, त्या मुलीला शाळेत मैत्रिणींनी चिडवल्यामुळं ती खूप रडवेली होऊन रडतच वडिलांकडे येते नी वडील तिची समजूत घालतात. बस फक्त दोन ओळीत सांगता येईल एवढीच हि थीम कवी 8 कडव्यात लिहून जातात. अतिशय भावस्पर्शी आणि काळजाला हात घालणारे शब्द आहेत,

1.
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

वडील मुलीला विचारत आहेत, काय झालं बाळ तुझे डोळे असे पाण्यानं का भरलेत. डोळे पाण्यानं भरण्याला त्यांनी गाई पाण्यावर आल्या अशी अफाट उपमा दिली आहे. का रडतेस बाळ तू, आई आणि वडील अशा दोघांच्या कुटुंबाची लाडकी लेक तू, रंगानं गोरी आणि सगळ्यांची आवडती अशा तुला कोण बरं बोललं?

2.
तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
“अहा,आली ही पहां भिकारीण”

तुझ्या अंगावर अजिबात दागिणे नाहीत, स्वतःच्या दागिन्यांचा गर्व करून तुला शाळेतील मुलींपैकी कुणी 'हि बघा भिकारीण आली' असं बोललंय का बाळे

3.
पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?

अतिशय दुःखी झालेला पिता पुढे आपल्या मुलीची समजूत घालत आहे, अगं कुणी बोलल्याने तू भिकारीण होणार आहेस का, चिखलात उगवलं म्हणून कमळ भिकारी ठरत का, धुळीत पडलेलं रत्न भिकारी होतं का, साध्या धाग्यात ओवला म्हणून फुलांचा हार भिकारी असतो का, नाही नं मग तुही कशी बरं माझ्यामुळं भिकारी होशील.

4.
नारीमायेचे रुप हे प्रसिध्द
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिध्द
तोच बिजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

पुढे मुलीला समजवताना त्याच्यातला बाप तिला स्त्रियांच्या मूळ आणि उपजत गुणांचीपण जाणीव करून देतो. स्त्रियांना जन्मतः एकंदरीतच दागिन्यांचा सोस आणि आवड असते तेच बीज तुझ्यात आले नसेल तरच नवल.तू तशीच इतर स्त्रिया मुलींप्रमाणे नटण्या मुरडण्याकडे वळशील बघ.

5.
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सूवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी

वडिलांना आपल्या मुलीची हौस पुरवायची कोण आवड ते म्हणतात, तुला मखमलीचे पोलके, मोत्याची कुडी, सोन्याचे कानातले फुल सगळं सगळं घेईन आणि तुझी हौस पुरविण पण हा अश्रूंचा महापूर आवर आता.

6.
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

बापानं मुलीला सांगितलं की मी तुझी सगळी हौस पुरविण तसा जीव खूप न लेकीवर पण गरिबीमुळे तिचे कोडकौतुक करता येत नाही म्हणून त्या पित्याला किती बरं यातना होत असतील, हा अनुभव ज्यांनी घेतला असेल ते बरोबर बापाच्या मनीची व्यथा समजतील

7.
देव देतो सद्‍अगुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

तुझ्या सारख्या सद्गुणी मुलांना देव का बरे आमच्यासारख्या करंट्या लोकांच्या पदरात घालत असेल, थांब मुली आता मी लांब तिकडे देवाच्या गावाला जातो आणि त्याला यामागचं कारण विचारतो.

8.
"गावी जातो” ऎकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालुनी करपाश रेशमाचा
वदे,”येते मी, पोर अज्ञ वाचा”

आपले वडिल लांब कुठं गावाला जातायेत म्हटल्याबरोबर मुलीची बालसृष्टी तिचं लहानगं जग एकदम बदलून गेलं. आणि लेकीने लगेच बापाच्या गळ्याला मिठी मारली आणि तुम्ही कुठं जाणार असाल तर मी पण सोबत येते असं म्हणाली.