Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Sunday, 26 March 2017

श्रमप्रतिष्ठा



वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेलं, वाचलेलं एकत्र करून माझ्या शब्दात लिहीलं आहे

***
एका कारखान्यात मोठीच्या मोठी यंत्र असतात, सतत 3 शिफ्ट मध्ये कारखान्यात काम सुरु असायचं. यंत्र म्हटलं की ती बिघडणारच, त्या यंत्रावर काम करणारे कामगार छोट्या मोठ्या दुरुस्त्या करण्यात चांगलेच हुशार झाले होते.तरीही...तरीही एकदा एक महत्वाचं यंत्र बंद पडतं, सगळं काम ठप्प होतं. कामगार त्यांना जमेल तशी पळापळ करून यंत्र दुरुस्त करायचा प्रयत्न करतात पण परिस्थिती जैसे थे. शेवटी अतीव नाईलाजाने एका इंजिनीयरला दुरुस्ती साठी बोलावण्यात येते. इंजिनियर येतो यंत्राकडे थोडावेळ बघतो आणि एका हाथोड्याने एका ठिकाणचा खिळा ठोकतो. झालं यंत्र एक मिनीटात परत सुरु होतं. कारख्यानाचा मॅनेजर इंजिनिअरला त्याच्या कामाचं बिल किती झालं विचारतो आणि त्याची रक्कम चुकती करतो. सगळे कामगार एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात कारण इंजिनिअरच्या बिलाची रक्कम कामगारांच्या पगारापेक्षाही जास्त असते. न राहवून एक कामगार विचारतोच 'काय केलं या माणसाने असं , एक खिळा तर ठोकला आणि त्यासाठी त्याला इतके पैसे कशासाठी द्यायचे, आम्ही मरमर महिनाभर काम करतो तेव्हा कुठं पगार हातात मिळतो तोसुद्धा इतका नसतो' इंजिनिअर त्याला उत्तर देतो 'मित्रा , मी हे पैसे खिळा ठोकण्याचे घेतलेलं नाहीतच तर कुठला खिळा ठोकला म्हणजे यंत्र सुरु होईल या ज्ञानाचे घेत आहे'

कष्टाचा मोबदला कमी असतो हे सत्यच आहे. कुठलीही संस्था किंवा संघटना यामध्ये व्यक्ती जितका वरच्या पदावर तितकं त्याला अंगमेहनतीचे काम कमी करावे लागते आणि निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग वाढतो. निर्णय घेणे, अंमलबजावणी करून घेणे तसेच कामाचे कार्यक्षेत्र वाढते , कक्षा वाढतात. म्हणजेच कम्पणीचा मालक स्वतः फार कष्टाची कामं करत नसतो, ac केबिन मध्ये बसून रहातो त्याचं काम कम्पनीची धोरणं ठरवणं त्यानुसार हाताखालच्या लोकांकडून ते काम करून घेणं, संपूर्ण कंपनी हि त्याची जबाबदारी असते. कामगार ठरवून दिलेलं काम ते तेवढंच तो करतो इतर ठिकाणी लक्ष द्यायची त्याला गरज नसते पण तुलनेत श्रम जास्त आणि मोबदला मात्र खूपच कमी असतो.

सध्या जगात सगळीकडे हेच चित्र बघायला मिळतं. शेतकरी काबाडकष्ट करतो परंतु त्याच्या हातात फारसं काही पडत नाही त्याउलट उच्चपदस्थ अधिकारी, बिझनेसमेन, डॉक्टर्स, इंजिनिअर तुलनेने अंगमेहनत कमी करूनही भरपूर पैसा कमावतात आणि सुखवस्तू जीवन जगतात. शिक्षण घेणे, एखाद्या क्षेत्रात प्राविण्य मिळवणे हेच सध्यातरी आपल्या हातात आहे. श्रमाला प्रतिष्ठा हवी , कष्टाची लाज नसावी इत्यादी फक्त पुस्तकात वाचायला भाषणात बोलायची वाक्य म्हणून बरी आहेत. खऱ्या जगात श्रमाला म्हणावं असं यश, पैसा नाही असेच मला तरी वाटतं


Tuesday, 17 January 2017

वस्त्र, पेहनावा, कपडे व लैंगिक शोषण


अंग झाकण्यासाठी कपडे, वस्त्र घालायची पद्धत कधीतरी सुरु झाली असेल. त्याआधीचा माणूस हा अंग झाकण्यासाठी झाडाची मोठमोठी पानं वापरत असे असं ऐकलं आहे, काही देवांच्या कथांमध्ये दागिन्यांनी स्त्रि पुरुष अंग झाकत असत असंही मी वाचलेलं आहे, त्याहीपूर्वी कधीतरी माणसाला अंग झाकायला हवं हि अक्कलच न्हवती तेव्हा स्त्री पुरुष दोघेही वस्त्रांशिवाय जगत होते आणि त्याचं काही विशेषही वाटत नसावं.

आताच्या काळात कपडे हि गरजेची गोष्ट आहेच आणि काही लोकांसाठी कपडे त्त्यांचा पहेनावा हा स्टेटस सिम्बॉलही असतो. पुरुषांना तशी कपड्यांची चॉईस करायला फार कमी वाव असतो, त्यातही आताशा त्यामानाने भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. वस्त्रप्रावरणे आणि त्यान्च्या निरनिराळ्या ऐकसेसरीजची खरी मजा स्त्रियांच्या विभागात बघायला मिळते. प्रचंड प्रमाणात वैविध्य बघायला मिळते, अगदी लहान मुलींच्या कपड्यापासून प्रौढ स्त्रियांपर्यंत सगळ्या वयोगटात कपड्यांची बेसुमार व्हरायटी आहे. स्त्रियासुद्धा त्यान्च्या नटण्याच्या उपजत आवडीपोटी वेगवेगळे वस्त्रांचे प्रकार वापरत असतात, आणि दिवसागणिक नवनव्या फॅशनची यात भर पडत असते.

स्त्रिया त्यातही मध्यमवर्गीय स्त्री कपड्यांची निवड करताना निरनिराळ्या गोष्टींचा विचार करत असते, सोयीस्करपणा पासून बजेटपर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते. त्यातल्या त्यात स्वतःला चांगलं दिसणाऱ्या कपड्यांकडे तिचा कल असतो. हे सगळं सुरु असताना पारंपरिक कपड्यांना नकळत छेद दिला जातो.  आणि जिथं छेद दिला जातो तिथंच चिक्तित्सा आणि टीका सुरु होते.

मुली, मध्यम वर्गीय स्त्रिया याना हमखास कपड्यावरून टीकेला तोंड द्यावं लागतं. शोभेल असे कपडे घालावे पासून तुला साडीच छान दिसते या कुठल्याही रेंज मध्ये टीकेचा सूर असू शकतो. मुख्यतः स्त्री चांगली दिसावी तशी ती दिसलीच पाहिजे हा अट्टाहास असतो, मला तर अगदी रेडी टू सर्व असले शब्द तोंडात येतात. बायकांनाहि नटण्याची आवड असतेच पण कोतुकमिश्रित नजरा सोबतच वासनेची किनार असलेल्या नजरा खुपू लागतात. अशोभनीय ठरवल्या गेलेल्या कपड्यांना कुठलाही क्रायटेरिया नसतो, अगदी लेगिंग शोभत नाही पासून मिनिस्कर्ट पर्यंत आक्षेप घेतले जातात. आक्षेप घेणारे पुरुष वेशाबाबत अजिबातच बोलत नाहीत, टॉवेल गुंडाळून बर्मुडा घालून उघडेबम्ब फिरणाऱ्या पुरुषांना कुणीही काहीही बोलत नाही.

स्त्रियांच्या कपड्यांचा थेट संबंध तिच्यावर होणाऱ्या लैंगिक शोषण व बलात्काराशीही जोडला जातो. ती काय छोटे कपडे घालते मग लोकं बघणारच तिच्याकडे वाईट नजरेनं असं म्हणून तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. पाळण्यातल्या , शाळेत जाणाऱ्या मुलींवरही बलात्कार नोंदले गेले आहेत. नखशिखांत झाकलेल्या स्त्रीलाही बलात्काराला तोंड द्यावं लागण्याच्या घटना घडून गेल्यात. म्हणूनच स्त्री लैंगिक शोषण, बलात्कार आणि तिने घातलेले कपडे यांचा संबंध मुळातच गैरलागू आहे.

स्त्रीच्या पोशाखाला तिच्या दिसण्याला महत्व न देता तिला एक माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळावी. ती स्वतः पोशाख तिला शोभेसा घालतच असते तितकी समज तिला असतेच असते फक्त तो बघणाऱ्याच्या नजरेला शोभला नाही की चर्चा सुरु होते. स्त्रीला बंधनात ठेवून अमुक घाल तमुक नको असले सल्ले देण्यापेक्षा आपल्या मूलग्यांना लहानपणापासून स्त्रीला सन्मान देण्याची शिकवण आणि एकूणच जगाकडे निर्मळ निरलसपणे बघण्याचे संस्कार दिले तर बरेचसे प्रश्न निकाली निघतील.