Friday, 24 November 2017

पट्ट्यातली राणी



एलिझाबेथ हि एक श्रीमंत बापाची एकुलती एक लेक, वडिलांच्या मागे अवाढव्य इस्टेटीची एकटी मालकीण म्हणजे एखाद्या राज्याची राणीच जणू. तिच्या इस्टेटीमुळं अनेक होतकरू लग्नाळू मुलगे तिला गटवायला मागे लागलेले असतात. तरीही लिझा वडिलांनी निवडलेल्या मुलाला होकार देते, त्याप्रित्यर्थ तो एक थीम पार्टी देतो. पार्टीच्या थीमनुसार लिझा सिंड्रेलाचा पोशाख घालून पार्टीत जाते. पार्टीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याला दुसऱ्याच एका मुलीसोबत नको त्या अवस्थेत बघते आणि घाईत पार्टी सोडून बाहेर पडते. लंडनच्या गारठणाऱ्या थंडीत आणि धुक्यात रस्त्यावरून पळताना एका गाडीला जाऊन ती धडकते. हि गाडी डॉक्टर बेरी ग्रेसनची असते जो एक अनाथाश्रम चालवत असतो, बेशुद्ध झालेल्या लिझाला तिच्या सिंड्रेलासारख्या कपड्यांवरून बेरी तिला गरीब आणि अनाथ समजून उचलून अनाथाश्रमात घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्धीवर आल्यावर लिझाला समजतं कि हे आपल्याला गरीब अनाथ समजतायेत मग ती ते नाटक सुरु ठेवते कारण तिला काही दिवस सुटका हवी असते. बेरी तिच्याहून 18 वर्षांनी मोठा, तिथं रहाताना हळूहळू बेरी व तिच्यात प्रेम निर्माण होतं. पण वयातील अंतर आणि तिथला जबाबदार चालक म्हणून बेरी कायम हे प्रेम नाकारत रहातो, कुंपणाने शेत खाल्ल असं होईल कि काय अशी त्याला भीती वाटत असते. त्यात बेरीची एक जुनी मैत्रीण असते तिचं त्याच्यावर प्रेम असतं पण बेरीचं तस काही नसतं, तर ही बया या दोघांमधील आकर्षण बरोब्बर हेरते. मग काय व्हॅम्प म्हणून ती तिचे कारनामे सुरु करते. त्यातूनही दोघांचं प्रेम फुलत जातं. लिझाचा गॉड फादर असतो ज्याच्यावर तिच्या स्वर्गीय वडिलांनी मुलीची जबाबदारी सोपवलेली असते, त्याच नाव मार्टिन. लिझा पार्टीतुन अचानक गायब झाल्यानं मार्टिन हवालदिल होतो. परत पोलिसात तक्रार देणं तिच्या श्रीमंतीमुळं नको म्हणून खाजगी गुप्तहेर लावून तो अखेरीस लिझाचा पत्ता मिळवण्यात यशस्वी होतो. लिझा आश्रमाच्या कामाला बाहेर पडते तेव्हा मार्टिन तिला रस्त्यात गाठतो आणि घरी परत चल म्हणून विनवतो, ती नकार देऊन बेरी विषयी सांगते. या दरम्यान बेरीची मैत्रीण या दोघांना भेटताना बघते आणि यांच्या विषयी नाही नाही ते बेरीच्या मनात भरवते. लिझाच्या प्रेमात पडलेला बेरी धड तिला प्रेमाची कबुली देऊ शकत नाही न धड तिला दुसऱ्या पुरुषासोबत बघू शकत. या सगळ्या घोळात त्याला तिचं श्रीमंत असणं, गडगंज संपत्तीची वारस असणं अचानक समजतं. आपल्याला तिनं अंधारात ठेवलं दयेचा गैरफायदा घेतला असे आरोप करून लिझाला आश्रम सोडावा लागतो. ती परत आपल्या महालात येते, पण तिचं जगणं हरपून जातं , हसणं नाहीस होत. तिची अवस्था बघून मार्टिन एक आयडिया काढतो आणि चॅरिटीसाठी एक ट्रस्ट बनवून त्यात बेरीला घेतो, त्यानिमित्त त्यांची भेट घडवून आणतो. खूप दिवसांनी समोर आल्यावर कोमेजलेली लिझा बघून बेरीचा जीव कासावीस होतो, त्याच्या केसात वाढलेले रुपेरी केस बघून लिझा घायाळ होते, त्या दोघांना त्या अवस्थेत सोडून मार्टिन काढता पाय घेतो. मग सगळे गैरसमज दूर होऊन राजा राणी एकत्र येतात, आणि शेवटपर्यंत आनंदात रहातात. हे झालं कादंबरीचं कथासार.

एलिझाबेथचं तरुणसुलभ वागणं, तिचं प्रेम , प्रेमापोटी एका अनाथाश्रमात दिवस काढणं, तिचं बेरीसाठी झुरण, केवळ अप्रतिम रंगवलं गेलंय. डॉक्टर बेरी हा चाळिशीतला अविवाहित अनाथाश्रम चालवणारा, त्याला लिझाविषयी वाटणारं आकर्षण तरीही स्वतःला अवरण्याची त्याची धडपड खूप आवडून जाते. ते दोघे दूर कि आपली हळहळ वाढते, हूरहुर वाटते तर ते दोघे एकत्र आले की आपलंच प्रेम मिळालं असं वाटत रहातं आणि हेच लेखिकेचे यश आहे. खूप हळुवार आणि तरल प्रेमकथा आहे ही, छोटंसं पुस्तक आहे मिळालं तर जरूर वाचा.


Sunday, 19 November 2017

सुर्याला थंडी वाजते जेव्हा

सुर्याला थंडी वाजते जेव्हा
चांदण्यांची शाल घेतो
किरणांचा दिवा मालवून
लवकर लवकर झोपी जातो

सूर्याची अवस्था बघून
चंद्रालाही दया येते
सूर्याला सांगतो आराम करा
तुमची ड्युटी मी करतो

सूर्याला काही करमत नाही
उगवल्याशिवाय रहावत नाही
झोपतो झोपतो म्हणता म्हणता
थोडावेळ येऊन जातो

चंद्रराव रागे भरतात
सूर्याला घरी धाडतात
हुरडा माडगं खायला सांगतात
सूर्य त्यांची आज्ञा पाळतो

सूर्य मस्त आराम करतो
पौष्टिक पौष्टिक अन्न खातो
चंद्राचे आभार मानून
आग ओकण्यास सज्ज होतो


Friday, 10 November 2017

लग्नाची गोष्ट

#ती बावळट , चष्मीश , एकटीएकटी रहाणारी पुस्तकात रमणारी. #तो तिच्या शेजारच्या काकूंचा भाऊ, देखणा, तिच्याहून 12 वर्ष मोठा. ती एकटी असे, सगळी मुलंमुली एकत्र खेळताना ती कोपरा गाठून पुस्तकात मान खुपसायची. तिचं एकटेपण त्याला लक्षात आलं, तो तिला इतर मुलात बोलवू लागला पण ती जास्त जात नसे मग तोच तिच्याजवळ येऊन गप्पा मारू लागला तिला बोलतं करू लागला. वडील बदलीमुळे सतत बाहेर , आई जॉईंट फॅमिलीमुळे सतत कामात गुंतलेली, तिला त्याच्यात मित्र आणि पालक मिळाला. हळूहळू दोघे मनाने जवळ आले, बघता बघता मामा म्हणून हाक मारणारी ती त्याला अहो म्हणू लागली, नावाने हाक मारायला कधी जमलंच नाही.
दोघे तसे बाहेर फिरायला वगैरे फार गेले नाहीत, खूप क्वचित घराबाहेर भेटत असत नाहीतर वाड्यातला ओटा हेच त्यांचं बोलायचं भेटायचं ठिकाण. दोघांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हा ती अकरावीत होती आणि त्याला मिलीटरी इंजिनिअरिंग सर्विसेस मध्ये जॉब नुकताच मिळाला होता. घरी समजल्यावर प्रचंड कल्ला, कारण जात वेगळी आणि वयातील अंतर. वडील म्हटले शिक्षण होऊ दे मग बघू, त्याना वाटलं तो कसचं थांबतो इतका पण तो थांबला. तिचं शिक्षण झालं तरी घरचे निरनिराळी कारणं सांगून ऐकत न्हवते. तिच्या घरचे अजिबात तयार न्हवते , त्यात मिलिटरीतील मित्रांच्या नादाने तो प्यायला पण लागलेला. वैतागुन 4 वर्ष बदली घेऊन तो अरुणाचल प्रदेशला निघून गेला. इकडे तिला पण जॉब मिळाला, तिला घरचे इतर स्थळ आणायचे पण ती हटून बसलेली तोच हवा म्हणून, आईवडील वैतागले. पाठच्या 2 बहिणींची लग्न आधी लावून दिली, दोन्ही लग्नात ती हसत होती. बहिणींची मुलंही तिने आवडीने सांभाळली. मुलगा काही घरी येईना म्हणून त्याच्या आईने कशीबशी लग्नाला परवानगी दिली मग तसं चोख कबूल करून घेऊनच तो पुण्यात आला. तिची बदली नसरापूरला झालेली ती रोज ST ने ये जा करत असे, एक दिवस त्याने खेडशिवापुरला ST अडवली आणि तिला घेऊन थेट रजिस्टारचं ऑफिस गाठलं. सकाळी कामाला घरातून गेलेली ती संध्याकाळी लग्न करूनच नवऱ्यासोबत घरी आली. दोन्ही कुटुंबातील ताण निवळायला वर्ष लागलं. सासूबाईनी आठ दिवसांनी घरगुती विवाहसोहळा करून घेतला आणि छोटं रिसेपशन दिलं.


  1. ती म्हणजे मी , तो म्हणजे आमचे साहेब. अजूनही मला नवरा, पालक म्हणून सांभाळणारा माणूस आहे. काही गोष्टींच्या बाबतीत मी त्यांच्यावर प्रचंड अवलंबून आहे, गाडीत पेट्रोल भरण्यापासून ते सगळा बाजार घरात आणून देण्यापर्यंत सगळं ते करतात. गाडी मी फक्त ऑफिसात जाताना चालवते एरवी कुठेही जाताना मी मागच्या सीटवर बसायचं काम करते. वयातील अंतर कधीही अडसर वाटला नाही, माझ्यापेक्षा तेच जास्त हँडसम आणि तरुण दिसतात. ह्या गृहस्थाने मला का पसंत केलंय इतके नखरे का सहन करतोय हे मला पडलेलं कोंडचं आहे

Monday, 23 October 2017

रस्ता

माझा भाचा तेजस लहान असताना रात्रभर जागायचा आणि दिवसभर झोपायचा, त्यात भर म्हणून रात्री घरात रडून दंगा करायचा. मला झोप कमीच , आयता नाष्टा डब्बा मिळायचा मग काय मी तेजसला घेऊन रस्त्यावर चकरा मारत असे. आमचा वाडा रस्त्यालगत आणि तेव्हा पुण्यात रात्री तशी भीतीही न्हवती. पहाटे 3 पर्यंत मी त्याला घेऊन वाड्याच्या बाहेर फिरत असे पाय दुखले की ओट्यावर बसून त्याला खेळवत असे. सुरवातीला रस्त्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी एकदोनदा हटकल त्याना समजून सांगितल्यावर ते काही बोलले नाहीत पण आम्ही बाहेर असेपर्यंत ते मामालोक त्या रस्त्यावर अर्ध्या अर्ध्या तासाला येऊन जात आमच्या सेफ्टीची त्यांनी काळजी घेतलीच. तेव्हापासून मला रस्ता आवडतो एक जिवंतपणा असतो व्हात्या रस्त्यावर. अजूनही सुट्टीच्या दिवशी सगळी कामं उरकली की मी उगाचच एकदोन चौक भटकून येते, आमचा MG रोड तर साक्षात जिवंतपणा आणि तारुण्य. पाडवा पहाटेला पहाटे 3 वाजता निर्मनुष्य रस्त्यावरून गाडी पळवताना एक वेगळाच अनुभव आला. तसंही मला मोकळं वातावरण आवडतं , बांधून घातलं की वेगळंच दडपण येतं फार कशाला लिफ्ट मध्येही मला दडपण येतं, नेमकं मी आत असतानाच लिफ्ट बंद पडली तर असले काहीबाही विचार येऊन जाम टेंशन येतं. हल्ली आता लिफ्टला लाईट गेली  तरी इन्व्हर्टरची सोय आहे लिफ्ट बंद पडणार नाही माहीत असूनही उलटसुलट विचार डोक्यात येतात आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी लिफ्टचं दार उघडलं की आग्र्याहून सुटका झाल्याचं फील येतं. एकंदरच बांधून घालणे प्रकार मानवत नाही म्हणूनच तर रस्त्याचे प्रवाहिपण भुरळ घालत नसेल ना

Tuesday, 19 September 2017

टेबल नंबर 21

एक तरुण जोडपं विवान आणि सिया , एक गेम शो जिंकून फिजी बेटावर ट्रिप बक्षीस मिळून लग्नाचा वाढदिवस साजरा करायला तिथे जातं आणि सुरू होते त्यांच्या आयुष्यात एक प्रचंड उलथापालथ. तिथे त्याना एक खान नावाचा माणूस भेटतो आणि विवान सियाला kbc च्या प्लॉटसारखा एक गेम ऑफर करतो. ह्या गेममध्ये तो ह्या दोघांना 21 प्रश्न विचारणार आणि प्रत्येक प्रश्नानंतर एक टास्क देणार, तो टास्क पूर्ण केला तर 1 कोटी रक्कम प्रत्येक स्टेपवर मिळत जाणार. 21 प्रश्न 21 कोटी रक्कम...विवान आणि सियाला भुरळ पडते आणि तिथंच ते फसतात. एकेका प्रश्नानंतर येणारे टास्क ह्या दोन  नवराबायकोकडून भयंकर गोष्टी करवून घेतात, बरं गेम मध्येच सोडायचा नाही हा नियम सगळीकडे नजर ठेवायला कॅमेरे आणि माणसं, पळूनही जाता येत नाही. ह्या टास्क मध्ये विवानने सियाचे केस कापणे, तिने त्याला मारणे, त्याने स्त्यावर तोडफोड करणे, तिने घाण खाणे अशी लई बेकार बेकार कामं करायला लावलीत.

शेवटचा टास्क म्हणून एक खून करायला विवान एका घरात जातो तर तिथे एक अर्धवट वेडा मुलगा असतो, त्याला बघून विवान सिया थक्क होतात आणि फ्लॅशबँक मध्ये आठवतात त्यांच्या कॉलेजचे दिवस. ज्याचा खून करायला हे तिथे आलेले असतात तो त्यांचा क्लासमेट असतो जो विवान सिया आणि गँगच्या रॅगिंगचा बळी असतो, त्याचं नाव अक्रम. रॅगिंग करताना जेजे विवान आणि सिया अक्रमकडून करून घेतात तेते सगळे टास्कच्या नावाखाली खान त्यांच्याकडून करवून घेतो. आता पश्चताप करून उपयोग नसतो अक्रम पूर्ण खचून वेडा झालेला असतो. मुलाची अवस्था बघून त्याचा बाप बदला तर घेतो पण त्याच्या पदरात काही पडत नाही तो हताश निराश. विवान आणि सिया स्वतःच्या चुका समजून लाजिरवाणी अवस्था झालेले...आणि पिक्चर संपतं

पिक्चरचं नाव टेबल नंबर 21, आर्टिकल 21 हा रॅगिंगविरोधी कायद्याचे कलम आहे

Sunday, 17 September 2017

वेदना

नका टोचू काट्यांनो
कातडी ही राठ नाही

झेलण्या दगडांना
हजर माझी पाठ नाही

छळतात सावल्याही
हल्ली त्यांची माझी गाठ नाही

आसवानी घेतले पाय मागे
त्याला त्यांची जाण नाही

तुझ्यासाठी जरी शून्य मी
हिशेब माझ्याविना पूर्ण नाही

अजुनी बघते वाट तुझी
जरी तुझा हा मार्ग नाही

Tuesday, 5 September 2017

भाऊ कदमचा गणपती



अप्रिय विषयावर लिहितेय कारण खूप उलटसुलट चर्चा वाचतेय, लॉजिकल पोस्ट खूपच कमी दिसतायेत, मी लॉजिकल लिहितेय असं माझं म्हणणं नाही पण मला जे वाटतंय ते लिहितेय. सगळ्यात आधी सांगणं म्हणजे कुणीही माझी जात शोधायला जाऊ नका मी सगळं सोडून बसलेय

1. पहिला मुद्दा भाऊ कदमने गणपती बसवला कदाचित श्रद्धेनं बसवला असेल किंवा तो व्यवसायाचा भाग म्हणून बसवला असेल. तो काम करतो त्या चॅनल्स तर्फे कलाकारांना तशा सूचना दिल्या जातात हे खुपजनांना माहीत आहे, नकार दिल्यास पुढे काम मिळणं अवघड होऊन बसतं हे सत्य आहे.

2. ज्या लोकांना भाऊने गणपती बसवला म्हणून संताप आला त्यांच्या प्रतिक्रिया सहाजिक होत्या. ज्या धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन तो धर्म सोडला त्याच धर्मातील गोष्टी 'आपला' माणूस करतो ह्याच्या यातना आणि त्यातून येणारी चीड आहे ती

3. बहिष्काराचा निषेध करणाऱ्या लोकांत प्रामाणिकपणे निषेध करणारे कमी आणि आता कसा तावडीत सापडलात म्हणून आनंदात पोस्ट टाकून उचकवणारे अधिक होते. ह्याच वेळी व्यक्तीस्वातंत्र्यचा आग्रह धरणाऱ्यानी हीच वर्तणूक कायम ठेवावी ही अपेक्षा

4. अतिशय त्रागा करून बहिष्कार, वाळीत टाकण्याची भाषा करणाऱ्यांनी आपण एरवी संविधानाचा पुरस्कार करतो हे ध्यानात ठेवावे आणि सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याबाबत आपली बांधीलकी विसरू नये. स्वधर्मि लोकांचे प्रबोधन करणे हाच एकमेव मार्ग तुमच्या समोर आहे

5. आपण जो धर्म सोडला त्यातील अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा याविषयी लिहिणं थांबवावे असा काही लोकांना सल्ला देऊ इच्छिते, कारण त्यामुळे कटुते शिवाय काही पदरात पडणार नाही. याबाबत काही लोक अतिशय टिंगल करणाऱ्या आणि थिल्लर पोस्ट लिहितात हे योग्य नाही, हे सोडून द्या

टीप - विषय माहीत नसल्यास कृपया चौकशी करू नये, उलटसुलट कमेंट्सला उत्तर देणार नाही. मी माझं म्हणणं लिहिलंय याउपर चर्चा नको. पटलं तर घ्या नाहीतर सोडा