Wednesday, 4 July 2018

झाकली मूठ

थोर लेखक, कलाकार लोकं आपल्या मनात घर करून असतात, त्यांच्या कलाकृती आपण आवडीने वाचतो. त्यांना नावाजतो, कौतुक करतो, डोक्यावरही घेतो. आपल्या मनात त्यांच्या बद्दल उत्तम अशी प्रतिमा तयार होते. पण काही काळाने त्यांची स्वतःची किंवा त्यांच्या बायकांची आत्मचरित्रे आपण वाचतो आणि आपल्या मनातल्या प्रतिमा धडाधड मोडकळीस येतात. आपल्या मनातल्या प्रतिमाभंजनाचे खापर आपण इतके दिवस मखरात बसवलेल्या लोकांवर फोडतो. एक आत्मचरित्र काय बाहेर येतं त्या कलाकारांची सर्वदूर बदनामी होते. ख्यातनाम आणि सगळ्यांचे लाडके लेखक पु.ल. देशपांडे आणि रणजित देसाई ह्या दोघांच्या विषयी अशीच लोकांची मनं गढुळली. नामदेव ढसाळ यांच्या बायकोचे आत्मचरित्र मी अजून वाचलं नाही पण तेही त्यांच्या खाजगी आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतेय असं ऐकिवात आहे.

इथे मला नेहमी प्रश्न पडतो की ही झाकली मूठ उघडली नसती तर समीक्षकानी कुणाला बरं नावं ठेवली असती, आपलं खरं रूप जगापुढे येऊ देणं म्हणजे आपल्या चुकांसाठी उठसुठ जोडे खाण्याची सोय तयार करून ठेवणं का ? मुळात आपण कुणाकडूनही अगदी कुणाकडूनही परफेक्ट असण्या वागण्याची अपेक्षा का करतो, आणि अशी अपेक्षा करणं योग्य का?  ते कलाकार आहेत, सेलिब्रिटी आहेत पण आधी ते माणूस आहेत, कुणी देवाचे अवतार किंवा अवलिया आणि चमत्कारि स्त्री पुरुष नाहीत. तुमच्या आमच्या इतकंच त्यांनाही चूका करण्याचा हक्क आहे. काही वेळा... न्हवे बरेचदा आपण आपला आणि इतरांचा चुका करण्याचा हक्कच मान्य करत नाही. चुकने ही सहजवृत्ती आहे, सराईतपणे आणि वारंवार केलेल्या घोडचुका आणि गुन्हेगारी वृत्ती मात्र ह्यात धरू नये.

खरंतर आपले खरे चेहरे जगापुढे आणू द्यायला मोठं धाडस लागतं, तुमचं आयुष्य उघड्या पुस्तकाप्रमाणे समोर ठेवलं तर त्याला चिकित्सा करून त्याचं पार खिळखिळ केलं जातं, ही दुनिया फार बाजींदी आहे ही तुम्हाला हसरे, परफेक्ट, बिनचूक मुखवटे घालायला भाग पाडते, मुखवटा हलला की भिंग घेऊन परीक्षण सुरू. अगदी मायक्रोस्कोप खालचा पॅरासाईट होतो तुमचा. तुमचं खरं रूप झेपत नाही जगाला म्हणून तुम्हाला आत एक बाहेर एक रहावंच लागतं. मोठेमोठे ह्यातून सुटले नाहीत , तुम्ही आम्ही तर सामान्य लोक... ह्या भीतीपायीच कित्येकजण आपल्या खाजगी गोष्टी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअर करत नाहीत. सहजवृत्तीने, भावनेच्या भरात घडलेल्या सगळ्याच गोष्टी जगाच्या चव्हाट्यावर मांडायच्या लोकं टाळतात ...  आपली झाकली मूठ लाखाची हाच बाणा योग्य असावा

टीप- वेगवेगळ्या बाओपिक, आत्मचरित्रावरच्या काथ्याकुटीनंतर मला जे वाटलं ते लिहिलंय, ह्याचा संजूशी संबंध नाही 😛 हो नाहीतर सगळा फोकस तिकडे जाण्याचा धोका आहे 😉

Monday, 23 April 2018

अनाहत

युट्युब वर टाईमपास करताना असाच कधीतरी अनाहत पिक्चर बघितला, उलटसुलट विचारांचं वादळ घोंघाऊन टाकणारा पिक्चर म्हणजे अनाहत. मल्ल देशाचा राजा आणि राणी एकमेकांवर खूप प्रेम करत असतात पण त्यांना वारस नसतो म्हणून अमात्यसभेच्या निर्णयानुसार नियोग विधीस तयार होतात. राणीचा नियोग विधीस विरोध असतो पण अमात्य सभेच्या निर्णयापुढे राजा झुकतो आणि राणी ह्या दिव्याला सामोरी जाते. नियोगासाठी राणी धर्मनटी म्हणून राजवाड्याबाहेर जाऊन जमलेल्या प्रजाजनातून एकजण एका रात्रीसाठी उपपती म्हणून निवडणार असते. जाताना श्वेतवस्त्रे धारण केलेली अत्यंत नाराजीने गेलेली राणी परत येते तीच मुळी तृप्त शरीर घेऊन, ह्या तृप्तीच्या खुणा तिच्या शरीरावर स्पष्ट दिसत असतात. ह्या एका रात्रीच्या अनुभवावर ती खुश असते आणि हेच राजा आणि अमात्यांना खटकते. तिच्या सखीशी नियोगरात्रीबद्दल बोलताना राणी आसुसून बोलते, हे सुख असं होतं, असं असतं हे तू कधीच का सांगितलं नाहीस असंही ती सखीकडे विचारणा करते. एका रात्रीने मिळालेलं शरीरसुख पुन्हा मिळावे म्हणून त्रिवार संधीच्या मान्यतेनुसार राणी राजाज्ञा देते आणि पुन्हा राजाला दवंडी द्यायला लावते. हि झाली ढोबळ कथा, त्यात जाणवलेल्या काही गोष्टी

राणीने नाराजीने का होईना नियोग पत्करला कारण तिने जर विरोध केला असता तर राजा साथ देईल अशी तिला खात्री नव्हती. सखीशी बोलताना तिची खंत दिसून येते, "पत्नीपेक्षा राज्य श्रेष्ठ वाटलं त्यांना, करायचा होता विरोध, नाकारायचा होता नियोग आणि राजेपद" पण असं होत नाही. स्त्रीत्व डिवचलेली दुखावलेली राणी सोनाली बेंद्रेने परफेक्ट साकार केलीये.

षंढ सिद्ध झालेला राजा, पौरुषाचा अपमान तरीही वारसांची लालसा. राणी नियोगाला जाताना पांढरे कपडे घालतेय, दागिणे नाकारते हे ऐकून खुश झालेला पुरुष. राणी परत आल्यावर स्त्रीत्व, पवित्रता गेली म्हणून रडेल, नाराज असेल म्हणून तिच्या सांत्वनाला सज्ज असलेला राजा आणि अमात्य तिचे समाधान बघून सटपटतात. नियोग आटपून तिने लगेच परत फिरायला हवं होतं पूर्ण रात्र तिथे ती काय करतेय म्हणून त्रासलेल्या राजाला राणीने फक्त वंशवृद्धीसाठीच हा विधी करणे अपेक्षित होतं, राणी मात्र तिच्या स्त्रीत्वाचा जागर करून येते.

सिनेमाचा शेवट मात्र घाईत उरकल्यासारखा मलातरी वाटला, राणी लग्नापासूनच्या प्रेममय क्षणांची राजाला आठवण करून देते आणि ह्या क्षणांच्या सोबतीने उरलेलं आयुष्य आनंदात काढेन असं सांगते आणि बाहेर तिच्या पुढच्या नियोगविधीची दवंडी पिटली जात असते. अनंत नागने राजाची भूमिका केलीये, नेहमीप्रमाणे तो अप्रतिम. मला अंकुरपासून अनंत नाग आवडतो, सगळ्या भूमिका जिथल्या तिथे करतो तो, कुठेही अति नाही की कमी नाही. नेहमी काहीतरी हटके घेऊन येणाऱ्या अमोल पालेकरांचा हा मराठी सिनेमा कोणतेही मत न देता ह्याचं इंटरप्रिटेशन प्रेक्षकांवर सोडतो.

स्त्रीच्या म्हटलं तर लहान म्हटलं तर मोठ्या अपेक्षा ह्यात दाखवल्यात, पती ठाम सोबत असता तर कदाचित राणीची पुढची वाटचाल वेगळी असती का ?
पती आपल्याला गृहीत धरून नको ते कृत्य करायला लावतोय हे समजून ती गोष्ट जबाबदारी म्हणून पार पाडताना त्यात रमणारी राणी योग्य की अयोग्य?

माझ्याकडे तरी ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, अजून खूप प्रश्न पडलेत परंतु लेखनमर्यादा ...

#अर्चना

Friday, 13 April 2018

तो काय करत होता

#असिफा 8 वर्षांची मुलगी, तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून ज्या निर्दयतेने हे सगळं घडलं ते बघता अनेक प्रश्न मनाला पडले. सुरवातीला काही काळ सुन्न अवस्थेत बसून राहिले आणि नंतर मनात न थांबणारे वादळ सुरु झाले, ते वादळ जसंच्या तसं लिहायचा एक प्रयत्न

असिफा मुस्लिम मुलगी आणि बलात्कारी हिंदू , त्यातून हि घटना घडली तीच मुळी भारताच्या अतिसंवेदनशील जम्मू काश्मीरमध्ये मग ह्या घटनेला राजकीय धार्मिक वळण लागणारच होतं. सगळे हिंदू वाईट नसतात आणि सगळे मुसलमान अतिरेकी नसतात पण अशा घटना समाजकंटकाना एकमेकांबद्दल राळ उडवायला उपयोगी पडतात. आपल्याकडे मुसलमान आणि दलितांबद्दल सहानुभूती लांगुलचलन ठरते आणि हिंदूंबद्दल मात्र गर्व, अभिमान असतो. मला स्वतःला लांगुलचालन आणि गर्व, अभिमान ह्या सगळ्या गोष्टींचा तिटकारा आहे, सगळे समान आणि समान दर्जा हेच माझं धोरण असते. असो ह्या मुद्द्याचा कितीही काथ्याकूट केला तरी त्यातून निष्पन्न काहीच होत नाही , म्हणून ह्या विषयाला इथे विराम

जेव्हा मी लहान मुलींवरील बलात्काराच्या बातम्या ऐकते तेव्हा मला नेहमीच प्रश्न पडतो ह्या लोकांचं हे धाडस झालंच कसं. कुठलीही पिलं अगदी कुत्र्या , डुकराची पिलंही गोंडस गोजिरवाणी दिसतात, त्यांना बघून माया, वास्तल्य, कौतुक दाटून येतं मग ही माणसं अशी कशी बरं बनली असतील की ज्यांना लहान लेकरं बघून ह्यांचे अवयव वळवळू लागतात. अगदी तान्ह्या मुलीपासून ते म्हाताऱ्या वयोवृद्ध स्त्रियांवर बलात्कार होतात. ह्या पुरुषांच्या मानसिकतेचे आकलन माझ्या अल्पमतीला अद्याप झाले नाही, ह्यावर एकंदरच शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास होणं अत्यंत गरजेचे आहे. ह्या मनोवृत्तीच्या लोकांना तर मग कुत्री , मांजरही पुरत नसेल किंवा अगदी निर्जीव बाहुलीशीही चाळे करत असतील. हा एक आजार आहे, ह्याचा इलाज व्हायलाच हवा. आरोपींना नंतर पश्चाताप होत असेल का बरं? हिट ऑफ मुमेन्टमध्ये डोकं आणि शरीर तापलेले असताना अशा घटना घडून गेल्यावर त्यांना लज्जास्पद आणि खजील तरी वाटत असेल का?

देवळात पोरीवर अत्याचार होताना… “तो काय करत होता” किंवा “देव असता तर…” अशी वक्तव्य ऐकू यायला लागली. मी स्वतः नास्तिक की आस्तिक हा माझा स्वतःचा प्रचंड वैचारिक घोळ असतानाही मला देव हि संकल्पना आवडते. माझ्या काही श्रद्धा आहेत पण कर्मकांडाला माझा प्रखर विरोध आहे. दिसला देव की जोडा हात आणि वहा कुंकू,फुले अशी मी नाही. मला देवळातल्या देवापेक्षा माणसाच्या मनातला देव जास्त आवडतो. देव शिक्षा करतो, पाप लागतं म्हणून चुकीच्या गोष्टी टाळणारी भाबडी लोकं मला फारफार आवडतात… त्यांच्या मनातला देव त्यांना पाप करू देत नाही. इथे तर देवळातच बलात्कार झाला मग देव ह्यांच्या मनातून तर कधीच वस्ती उठवून गेलेला दिसतोय. तो तिथे नाहीच तर “तो काय करत होता” अशी पृच्छा करणेही व्यर्थ.

देवा,

जर तू असशीलच कुठे तर अशा अतृप्त लोकांच्या मनात रहा रे बाबा. तुझा धाक त्यांना वाटेल असं काही करच तू त्यांना. तुझ्या काठीला आवाज येऊ दे यार. “तो बघतोय” ते “तो काय करत होता” हा तुझा प्रवास मला अजिबात आवडला नाहीये… ये धावून, दाखव तुझे अस्तित्व आणि “तो बघतोय” असा तुझा दरारा कायम कायम राहू देत

Monday, 5 March 2018

हँडल विथ केअर

पार्सलवर वाचलंय ना बरेचदा … हँडल विथ केअर, नाजूक काचसामान असतं आतमध्ये… धक्का लागून फुटू नये म्हणून थर्माकोल, पेपर्स आणि कायकाय गुंडाळून पॅक करतात… खूप जपावं लागतं, सुरवात ते शेवट नुसती जपणूक करा… जर्रासं दुर्लक्ष आणि खळकण फुटलंच समजा… काही नातीही अशीच असतात, आणि माणसंही… थोडं बिनसलं कि पटकन रुसणारी, फुटणारी... ह्यांना केअरफूलली हँडल करूनही एखादा कपाचा कान तुटतोच… मग त्याला दिवाणखाना वर्ज्य होतो… अगदी नाईलाज झाला तरच हे कानतुटके कामाला येतात

रस्त्यावरून जाणारे डिझेल, पेट्रोल आणि एक्सप्लोजिव्हचे मोठमोठे ट्रक्स असतात... मागे लिहिलेय असतं डेंजर… जिवंत बॉम्ब असतात ह्या गाड्या… धडकलं कि स्वतःचा आणि दुसऱ्याचा नायनाट करणाऱ्या… अशीच काही लोकं आणि नाती, गच्च दारुगोळा भरूनच असतात… धुमसणारे सुप्त ज्वालामुखी जणू… तुम्ही आपटा किंवा ते तुमच्यावर आपटोत भडका ठरलेला… हानी होणार हे एकशेएक टक्के खात्रीशीर… मग ओघाने आलंच ड्राइव्ह विथ सेफ डिस्टन्स

काही नमुने लोखंड, अल्युमिनियम, पितळ, तांब्या आणि स्टेनलेस स्टीलचे… कितीही आपटा, धोपटा, पोत्यात भरा, माळ्यावर टाका, मोडीत काढा… तरीही हुं कि चुं न करणारे, ब्र निघतच नाही… ठोकलं, पोचे पडले तरी उपयोगी… अगदी कुणी मुद्दाम छंनी, हातोडा घेऊनच ठोकलं तर भोकं पडणारी… दुःखं, वेदना पचवण्याची दुर्दम्य ताकत बाळगून असणारी भांडी, हीच संसारोपयोगी

नाजूक बिल्लोरी काचकाम मन भुलवतं… जप जप जपावं लागतं, आगडोंब धगधगणारे ज्वलंत प्रकार भीती दाखवतात, सुरक्षित अंतर राखून असावं नाहीतर जाळून खाक करतात… अतिसामान्य, रोजच्या वापरातल्या वस्तूच आशादायक वास्तव...लंबी रेसके घोडे… कुठेही फेकलं तरी चार पायावर उभ्या रहाणाऱ्या मांजरासारखी

Monday, 26 February 2018

इश्यू नॉनइश्यू

दोन दिवसात तीन घटना घडतात,

एक प्रसिद्ध नटी अकस्मात हे जग नैसर्गिकरित्या सोडते तेही भारतभूपासून दूर कुठेतरी परदेशात. तिचे लाखो चहाते आहेत त्यांना वाईट वाटणं सहाजिक आहे. क्लासेस पासून मासेस पर्यंत दुःखं हळहळ व्यक्त केली गेली. खुपजनांना आपले टिनएज, कॉलेजचे दिवस आठवले. पहिलं प्रेम, ती हुरहूर, तिचे सिनेमे, तिचे नृत्य सगळं सगळं आठवून लोक हळवे झाले. मोहम्मद रफी गेले तेव्हा आईला मी ढसाढसा रडताना बघितलंय, त्यामुळे पोस्टींचा पाऊस आणि त्यातून जाणवणारा गहिवर मी समजू शकते. मला स्वतःला हे अजिबात खटकलं नाही, मी एकही पोस्ट लिहिलं नाही खरंतर मलाही वाईट वाटलं होतं पण दरवेळी व्यक्त व्हायलाच हवं असं काही नाही म्हणून नाही लिहिलं. पोस्टींचा पावसात काही बेडूक उलटेहि पोहून गेले अगदी अति झालं पासून तिचे समाजात योगदान काय इथंपर्यंत चर्चा झाली, हेहि ठीक आहे ती त्यांची अभिव्यक्ती म्हणून आपण मान्य करू पण काही पोस्टवर अगदी खालच्या थरातल्या कमेंट्स आल्या, तिच्या चारित्र्याबद्दल लिहिलं गेलं,तिच्या वेटलॉस आणि cosmatic सर्जरी बाबत मन मानेल ते लिहिलं गेलं, तिच्या पतीपत्नी मधील वोह असण्याबद्दल काही अतिहुशार आणि सर्वज्ञानी लोकांनी आपली अक्कल पाजळली. काय असतं ना अभिव्यक्ती आहे म्हणून आपण निरर्थक ,अर्थहीन , निराधार आणि अश्लील बोलत असू तर त्या बोलण्याला शून्य किंमत आहे.

तिकडे केरळात मधु नावाचा मनोरुग्ण आदिवासी तांदूळ चोरून जंगलात पळाला, त्याचा काही शहरी लोकांनी पाठलाग केला, त्याला पकडून जबर मारहाण केली. इतकं मारलं कि त्याने नंतर रक्ताच्या उलट्या करून प्राण सोडले. हे सगळं करताना त्यांनी व्हिडीओ शूट, सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. कुठून येतो इतका क्रूरपणा. तांदळासाठी माणसासारखा माणूस मारला जातो ,आपण स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजात रहातो असं कसं म्हणावं. जंगलं कमी होत असताना आदिवासींची कायमच दैना होत आलीय त्यातून जर असे प्रकार झाले तर नक्षलवाद फोफावणे अटळ आहे. ह्या ज्वलंत विषयावर खूप कमी लोक रिऍक्ट झाले. आपले इश्यू अशारितीने नॉनइश्यू बनतात हे एकंदरच घातक आहे.

तिकडे बिहारमध्ये एका SUV ने नऊ शाळकरी मुलं चिरडली गेलीत, आता ही गाडी एका राजकीय नेत्याची आहे म्हणे. गाडी कुणाची, कोण चालवत होतं ह्यावर उलटसुलट मतं येत आहेत, ह्याला पूर्ण राजकीय वळण दिलं जाईल. हा प्रकार तर इथे खुपजनांना माहितीही नसेल

एकाच कालावधीत घडलेल्या तीन दुर्घटना, पहिली घटना नैसर्गिक समजून हळहळ , प्रेम व्यक्त करून सोडून देता येईल पण इथेही वेळकाळ न बघता त्याची वाट लावूनच टाकली गेली. उरलेल्या दोन बद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे पण होईल असे वाटत नाही. सिनेमा, क्रिकेटच्या बाहेर आपल्या अभिव्यक्तीचा टक्का कधी वाढेल तो सुदिन. आपल्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण बोललं पाहिजे, बोलून काय उपयोग असं वाटत असेल तर मग सिनेमा ,क्रिकेटवर लिहिताना लेखण्या कशा सरसावतात. इतकं सहजसोपं बघायचं का जगाकडे, मग आपल्या गरजा पूर्ण झाल्या नाही तर बोलायचा अधिकार आपल्याला उरतो का? असो, इश्यू आणि नॉनइश्यू न समजणारा समाज कुठल्या दिशेने जाणार आहे कोण जाणे

Thursday, 22 February 2018

छद्मस्त्रीवाद

लोक शिव्या देतात. आई बहिणीवरून मिळणाऱ्या शिव्या मनाला टोचतात , ह्या शिव्या वर्मावर घाव घालतात म्हणून त्या तशा जास्त दिल्या जातात. लायकी काढायला बापावर शिव्या दिल्या जातात. काही लोकांच्या सहज बोलण्यातही शिव्या असतात त्यात फार गंभीर काही नसतं पण त्यांची जीभ रुळलेली असते. मी स्वतः पुण्यातल्या मोठ्या झोपडपट्टीच्या जवळच्या चौकात वाढलेय, रात्री अपरात्री रस्त्यावरून भांडण शिव्यांची लाखोली कानावर कायमच पडलेय पण मी आयुष्यात कधीही शिवी दिली नाही. मी आणि माझी भावंडं शिवी देऊच शकत नाही असं वळण आमच्या आईवडीलांनी आम्हाला लावलं. ह्या शिव्यावरून एक कविता सध्या viral झालीय आणि गावभर फिरतेय, मला ती कविता खटकली अजिबात आवडली नाही म्हणून ती कविता फॉरवर्ड करणाऱ्या दोन पोस्टवर मी खालील कमेंट्स केल्या नंतर त्या वॉलवर पोस्टही केल्या

1) टोचणाऱ्या, डसणाऱ्या , बोचणाऱ्या गोष्टींच्या आरपार बघता आलं पाहिजे म्हणजे जगणं शक्य होतं. त्याच्यावर रिऍक्ट होणं म्हणजे त्या गोष्टींचं महत्व वाढवणे, त्यांना ग्लोरिफाय करणे. Ignorance is bliss.

2) अश्लीलता, अर्वाच्यता ह्यांचा धिक्कार करताना त्याच अस्त्रांचा वापर केला तर ह्यात नक्की विजय कशाचा होतो. सभ्यता तिथे मान टाकतेच ना ?

शिवीला उत्तर शिवी कशी होऊ शकेल किंवा आईबहिणीवरून शिव्या द्यायला नकोत म्हणून स्त्रीवादी जहाल भाषेत लिहिताना अर्वाच्य भाषेत लिहितात हे माझ्या अजिबात पचनी पडलं नाही. एकूणच सध्याचा स्त्रीवाद माझ्या अकलेबाहेरचा आहे. स्त्रीसक्षमीकरणात आपण अजून मैलोगणती दूर असतात स्त्रीवादी स्मोकिंग, ड्रिंक्स आणि खुल्या शरीरसंबंधावर चर्चा करतात तेव्हा भंजाळून जायला होतं, मंजे त्यांनी तसं जरूर वागावं लिहावं पण ही आपली प्राथमिकता नाही. आपली प्राथमिकता स्त्रीभ्रूण हत्येचा विरोध, स्त्री शिक्षण, तिचा कुटुंबातील आणि समाजातील दर्जा उंचावणे ह्या पायऱ्यांवरून पुढे जायला हवाय असं माझं प्रामाणिक मत आहे. ह्या बेसिक गोष्टी सोडून तिला शारीरिक समाधान कसे मिळवायचे ह्याचे धडे देत बसणं मला अनाठायी आणि अनावश्यक वाटतं. एकंदरच सध्याचा एकूणच स्त्रीवाद भरकटला गेला आहे असं माझं म्हणणं अजिबात नाही, चांगल्या गोष्टीही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत पण दिसताना ह्या काही मोजक्या चुकीच्या गोष्टी समोर येतात कारण त्यात भपकेबाजपणा अधिक आहे. ग्राउंडलेव्हलवर काम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष असलं आकर्षक लिखाण करत नाहीत त्यांना तितका वेळ वाया घालवायचा नसतो. हे छद्मस्त्रीवादी निव्वळ आकर्षक , चमकदार लिहून एकूणच स्त्रीवादाविषयी चुकीचा समज समाजात पसरवायला कारणीभूत होतात असे माझं स्पष्ट मत आहे. होय मी ह्याला छद्मस्त्रीवाद किंवा स्युडोफिमिनिझम असंच म्हणतेय, कारण ते तसंच आहे.

Friday, 9 February 2018

कुटुंब व्यवस्थेवर स्वैर विचार

वाढत्या वयातले आणि विवाहबाह्य संबंध ह्यावर बरेच उहापोह होत असतात, हे संबंध अहितकारक आणि भावी पिढीच्या एकंदरच भावविश्वावर परिणाम करणारे असतात असं माझं स्वतःचं म्हणणं असताना अशा संबंधातील व्यक्तींच्या मनोव्यापाराचा मागोवा घेतला असता मला व्यक्तीशः त्यांच्याबद्दल कीव आणि दयाच वाटत आली आहे, घृणा वगैरे अजिबात वाटत नाही, मला जाणवलेले काही ठळक मुद्दे

1 बऱ्याचदा लग्नानंतर (ठरवून किंवा प्रेमविवाह)  आलेल्या जबाबदाऱ्या पेलता पेलता स्त्रीपुरुष दोघांचीही अवस्था आता उरलो मागच्या पिढीच्या सेवेकरता आणि पुढल्या पिढीच्या पालनापुरता अशी होऊन जाते. दाम्पत्याचे मनसोक्त जगणं, एकमेकांशी साध्या गप्पा, अधूनमधून फक्त स्वतःसाठी काढायचे क्षण दुर्मिळ होत जातात. आणि हे रितेपण शोधताना नजरा उंबरा ओलांडू लागतात

2 विवाहबाह्य किंवा ज्याला असामाजिक समजलं जातं अशा संबंधाचे कारण शारीरिक, मानसिक, बौद्धिक , काहीवेळा आर्थिक अतृप्तता असते त्याचं तुष्टीकरण जिथे होतं तिथे माणूस आपोआप खेचला जातो. ह्यात सहभागी दोन्ही व्यक्ती तारतम्याने वागणारी नसली कि त्यांचे संसार फाटलेच समजा, तारतम्याने वागणारे असतील तर त्यातल्या त्यात समाजमान्य रस्ते शोधले जातात किंवा स्वतःला आवर घातला जातो

3 विवाहानंतर काही नवरे डोमीनेटींग वागू लागतात, हरएक गोष्टीत त्याची परवानगी घ्यावी लागते. एक पैसा मनाने खर्च करायची सोय काही घरांत स्त्रियांना नाही, मोबाईल वापरू दिला जात नाही ; दिला तरी तो सतत तपासला जातो. काही ठिकाणी परिस्थिती उलटसुद्धा असू शकते, अशा नात्यात तिची आणि त्याची जीवघेणी फरफट सुरु होते. मुलांकडे बघून असे संसार रेटले जातात, त्यात ना आईबाप सुखी असतात ना मुलं. आईवडिलांचं आपसातील वागणं मुलांना दिसत असतं, समजत असतं त्यामुळे मुलंही चिडचिडी होतात

4 आपसात कितीही पटलं नाही तरी मुलांसाठी लग्न नावाचं जोखड मानेवर ठेवून खूप जण “सुखी संसार” करत असतात. आपली कुटुंबव्यवस्था अशी आहे की मुलांना आपण कायम जवळ बांधून ठेवतो. जनावरांची/ पक्ष्यांची पिलं पंखात बळ येईस्तोवर आईवडिलांना खेटून असतात, मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो पैसा कमावू लागला, त्याला मुलं झाली तरी आईवडील आणि मूल ह्यातले बंध सुटत नाहीत. आशियाई देशांत तर ही पद्धत आहेच. युरोप, अमेरिकेत मात्र मुलांना आर्थिक सक्षम करून त्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते, त्यामुळे त्या देशांत घटस्फोटाचा मुलांवर म्हणावा असा वाईट परिणाम होत नाही

5 कुटुंबव्यवस्था पूर्णपणे कर्तव्यावर बांधली गेली आहे ह्यात स्व ला स्थान नाही. घरातील मुलं आणि ज्येष्ठ ह्यांच्याप्रति आपली कर्तव्य उचलण्यात हयात जाते आणि हाच वसा पुढच्या पिढीच्या पदरात आपण देत जातो. अतृप्ती, असामाधान असेल तरीही त्याची पूर्तता करण्याचं धाडस फार कमी लोकांत असतं. हजारातला एखादा हा मार्ग पत्करतो, हा मार्ग योग्य कि अयोग्य हे आपण नाही सांगू शकत, दुसऱ्यांच्या गरजा चूक कि बरोबर हे आपण नाहीच ठरवू शकत. त्यांच्या ह्या रुळलेल्या वाटा सोडून जगण्याने पूर्ण कुटुंब उद्धवस्त होते हे मात्र खरे आहे. कुटुंबाचं पूर्ण भावविश्व ढासळून जातं. मन मारून जगणे हा एकमेव उत्तम मार्ग आहे, ह्याला त्याग असं गोंडस नाव देता येईल.

आर्थिक, भावनिक गुंत्यात सापडलेली मधली पिढी मन मानेल तसं नाही जगू शकत. जेष्ठांना सन्मानाने रहाता येतील अशी ओल्ड एज होम आणि लहानांना लवकरात लवकर स्वावलंबी करणे हा व्यावहारिक उपाय मधल्या पिढीला जरा मोकळा श्वास घेऊ देईल पण ह्याला मधली पिढी तयार आहे का?