Wednesday, 5 September 2018

शिक्षकदिन

आता शाळा आणि शिक्षक आठवायचे म्हणजे कोणेएकेकाळी वगैरे प्रकरण , चांगलंच धूसर झालेलं तरीही त्यातून काही ठळक चेहरे लक्कन चमकून जातात. पटकन आठवणारी मोजकी नावं आणि त्यातलं पहिलं नाव आमच्या कन्या शाळेतल्या संस्कृत आणि मराठीच्या पै बाई. कन्या शाळेत शिक्षिका भरणा जास्त, बापे शिक्षक जवळपास नाहीतच त्यामुळे सतत कोणी ना कोणी मॅटरनिटी लिव्हवर असे त्याला बदली शिक्षिका म्हणून तात्पुरत्या आलेल्या पैबाई खूप लवकर मुलींच्या गळ्यातला ताईत बनल्या. दिसायला बऱ्यापैकी देखण्या, शांतपणे आणि खूप रंजक शिकवण्याची पद्धत , पाठांतर करून घेण्यावर त्यांचा खूप भर असायचा.आज जे काही शुद्धलेखन आणि मराठी लिहायचा सराव आहे त्याचं पूर्ण क्रेडिट मी पै बाईंना देते. बाईंच्या साड्या बहुतेक प्लेन , सुळसुळीत आणि सायलेंट कलरच्या असत, लेमन, पिस्ता, गुलाबी , बदामी हे रंग खास बाईंसाठीच निर्माण झाले असावेत इतक्या ह्या रंगाच्या साड्या त्यांच्यावर सुंदर दिसत. लांब केसांची सैल वेणी आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचं फुल हमखास असे. अतिशय प्रसन्न दिसणाऱ्या पै बाई तेव्हा शॉफर ड्रीवन कार मधून शाळेत येणाऱ्या एकमेव शिक्षिका होत्या. त्यांच्या कारचं आम्हा मुलींना खूप कौतुक वाटायचं, त्यांच्या शाळेत यायच्या वेळेला आम्ही मैत्रिणी गेटजवळ घुटमळत असू आणि ती कार बाईंना सोडून जाईपर्यंत एकटक बघत असू. सुखवस्तू, संसारी , आनंदी स्त्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच सौन्दर्य असतं ते पै बाईंमध्ये आम्हाला गवसलं. नंतर त्या पर्मनंट आमच्याच शाळेत आल्या, अगदी दहावीचा सेंडऑफ होईपर्यंत सोबत होत्या. आता त्या जिथे कुठे असतील तिथे त्यांना मनोभावे नमस्कार.

पै बाईंच्या उलट दुसऱ्या एकजण होत्या उमर्जी बाई. त्यांना माझ्या कुरळ्या केसांचा काय राग होता कोण जाणे. तेल लावून चापूनचोपून वेणी घातली तरीही माझे केस थोड्या वेळातच बंड करून स्वतःची आग्र्याहून सुटका करून चेहऱ्यावर आक्रमण करायचे. उमर्जी बाई इंग्रजी शिकवायच्या, कायम त्रासिक चेहरा खुर्ची तर कधी सोडतच नसत. खुर्चीत बसूनच शिकवायच्या आणि नेम धरून खडू टपकन माझ्या डोक्यावर मारायच्या की मी समजायचे आणि केस शक्य तितके आवरायचे. त्यांच्या तासाला शिकले कमी आणि केसच जास्त आवरले. कहर म्हणजे एकदा त्यांनी माझ्या समोरून झेपावणाऱ्या केसांना कात्रीने कापून मोक्ष मिळवून दिला. जेव्हा मला कावीळ होऊन मला शाळेतच उलट्या होऊ लागल्या तेव्हा मात्र उमर्जी बाईंनीच मला घरी सोडायची व्यवस्था केली तेव्हा कुठं थोडीथोडी त्यांच्याविषयी आपुलकी वाटली.

शाळेतून ज्युनियर कॉलेजला गेलो आणि पहिल्यांदा बॉईज आणि गर्ल्स मिक्स बॅच अनुभवली. आमचे बायोचे सर दीपक शहा, नुसता गोरापान चिकना देखणा. सरांना सर म्हणायला जीभ रेटत नसे, त्यांचं वय तिशीच असावं. शिकवायचे कसे हा प्रश्न अलाहिदा दिसायचे मात्र खूप भारी. मला खरंतर आर्टसला जायचं पण वडिलांचा आग्रह म्हणून नाराजीने सायन्स घेतलं पण सरांना बघून नाराजीचा मिस्टर इंडिया झाला. वर्गातल्या सगळ्या पोरी सरांवर फिदा आणि त्यामुळे पोरांची सरांवर खुन्नस. सरांवरच सगळ्या पोरी मरू लागल्यावर पोरांची डाळ कशी शिजावी. सरांनी मात्र ह्याचा फायदा कधीच घेतला नाही. पोरी आपल्याकडे एकटक बघतात हे त्यांनाही माहिती होतच पण ते बिचारे नुसते शिकवतच असत. त्यामुळे किती नाजूक हृदयं कोमेजली ह्याची गणनाच नाही. फ्रॉग मेटिंगचा चॅपटर शिकवताना लालेलाल झालेले आणि नंतर झटकन वर्गाबाहेर गेलेले सर, खाली मान घालून खुदुखुदू हसणाऱ्या मुली आणि एकमेकांत जोक करून हसणारी मुलं हे लिहिताना जसंच्या तसं डोळ्यासमोर फ़िरतंय. आता सर काय करत असतील कोण जाणे

सिनियर कॉलेजला मात्र कोणतेही सर, बाई म्हणावी असे आवडले नाहीत. शिक्षक म्हटले की  शाळेचेच शिक्षक आठवतात कॉलेजचे नाही ह्यामागचं कारण काय असावं बरं... कदाचित आपल्या नाजूक आणि कोवळ्या मनावर उमटणारे हे फॉसिल्स असावेत जे खूप वर्षांनी आपल्या खुणा जपून ठेवतात

Tuesday, 28 August 2018

कविता 2018

ताकानेही पोळला जीव इथे
दुधावर घ्यावा आळ कशाला

आपलेच बनतात पुरते वैरी
दुष्मनाला उगाच भार कशाला

मीही ओढते रेघा, काढते अक्षरे
अर्थहीन शब्दांचे घ्यावेत माग कशाला

माझ्यातून पुरता सरला नाही
अवकाळी पावसाचा राग कशाला

केलेस पुरते घायळही नाही
आता पुसावा हालहवाल कशाला

#अर्चना
वाटेला पावलं विसरावीत असं काही घडलंय
पुन्हा आरशाने हसणं सोडलंय

अंतरंगात डोकावणारं वहीचं शेवटचं पान तू
पुन्हा कोरंकरकरीत होऊन सजलंय

मनाला उभारी कशी यावी आता
स्वप्नं तुझ्या पापणीत डोळे मिटून निजलंय

जुन्याच खाणाखुणा अनोळखी भासतात
एका चेहऱ्यावरचं आपलेपण धुळीनं माखलंय

मीही अजून नाद सोडला नाही पुरता
बघते मी काहीतरी जे तू वळून लपलंय

#अर्चना

Monday, 27 August 2018

रँडम थोट्स

प्रेम मिळवणं म्हणजे नेमकं काय असतं बुवा? ती एखादी वस्तू थोडीचे की उचलून तिजोरीत ठेवावी... मग ते मिळवायचं कसं. त्याने हो म्हटलं , तिने हो म्हटलं की प्रेम मिळतं का? की त्या नात्याला एक नाव द्यावं आणि मॅरेज सर्टिफिकेटमधून जखडून टाकावं एकमेकांना? प्रेमाचं माणूस आपल्या मालकीचं व्हावं ही इच्छा म्हणजे प्रेम मिळवणं म्हणावं का? मालकी आली की त्याला किंवा तिला आपल्या तालावर नाचवणे ही सुप्त इच्छा ह्या मालकी मिळवायच्या मागे असावी का?  अनेक प्रश्नांची गुंतावळ
प्रेम ही आदिम तहान आहे... ते कुणावरही होतं आणि सुरू होतो हे प्राप्त करायचा खेळ... ते मिळालं रे मिळालं की माणूस सुखावतो , निर्धास्त होतो असं काही नसतं, मग त्याला कायम ताब्यात ठेवण्याची चिरंतन धडपड सुरू होते... त्याला किंवा तिला फक्त आपल्यापुरतं राखीव ठेवण्यासाठी संरक्षित कुंपण घातलं जातं, हे कुंपण ज्याचं त्याचं वेगवेगळे असतं. काही कुंपण अगदीच घरालगत तर काहींचे परीघ विस्तारित असतात. बिनकुंपणाचं नातं बहुतेक अजून जन्माला यायचंय. वो जो अपना था और किसीका क्यूँ है... ह्या प्रश्नानंतरची तडफड म्हणजे प्रेमाच्या दुनियेतलं सगळ्यात विदीर्ण करणारं दुःखं, ही तडफड व्यक्तिमत्त्व उद्धवस्त करणारी ठरते... ह्यातून सुखरूप तरला तो जिंकला
प्रेमाची तहान कधी पूर्ण होऊच नये ... ही तृष्णा कायम रहावी म्हणून ते कधी आपलं होऊ नये. आपलं झालं की त्यातला चार्म नाहीसा होत असावा आणि मग शिरापुरी पुढल्या घरीचा खेळ सुरू होत असावा... म्हणून तर म्हणणारे म्हणतात की 'प्रेम एकदाच होतं ही अंधश्रद्धा आहे'

---

शॉर्टकट लॉंगकट हे मिथ्या असावं... शॉर्टकट सिटीतून जातो तिकडे ट्रॅफिक फार असते ह्या कल्पनेनं बरेचजण शहराबाहेरच्या थोड्या लॉंगरूटने जातात आणि मग तिकडेच ट्रॅफिक जाम होऊन अडकून पडतात. शहरातून तुलनेनं लवकर मुक्कामी पोचतो

भ्याड हल्ला हा शब्द खूपदा ऐकतो, हल्ला करणारे भ्याड कसे असतील? ते तर शूरपणाचं लक्षण... शांतता हे सामर्थ्याचं चिन्ह आहे की नेभळट असल्याचं? हल्ला हा भ्याडच असतो कारण अटॅक इज बेस्ट डिफेन्स ह्या मानसिकतेतून तो निःशस्त्र आणि गाफील व्यक्तीवर केला जातो. शूरपणा तेव्हाच म्हणतात जेव्हा समोरचा व्यक्ती गाफील नसतो आणि समान शस्त्रे घेऊन सज्ज असतो

शांतता सामर्थ्यवान व्यक्तीला दागिन्यासारखी शोभते. नेभळट आणि भित्र्या माणसाची शांतता ही लगेच लक्षात येते. सामर्थ्यवान व्यक्तीने शक्यतो शांतच रहावे, अगदीच नाईलाज झाला तर निसटून जावे पण कधीही परत हल्ला करू नये. 

सामाजिक एकोपा टिकवणे हे बहुसंख्य असलेल्या समाजाची जबाबदारी असते. संख्येने थोडे असलेले भीतीपोटी घाबरून तरी राहतील किंवा अटॅक इज बेस्ट डिफेन्स ह्या तत्वाने वागतील

#रँडम_थोट्स

©अर्चना चंद्रसेन

Thursday, 23 August 2018

मर्द को भी दर्द होता है

आपल्या सोसायटीत किंवा आपण सध्या जगतोय त्या समाजात जे जे  वरिष्ठ आणि उत्तम मानलं जातं त्यांना तितकंच क्रीटीसाईज सुद्धा केलं जातं. ह्यात पुरुष  असणं, सुंदर असणं, श्रीमंत असणं हा अपराध किंवा गुन्हा असावा ह्यातऱ्हेनं बोललं जातं. ह्या उच्च समजल्या जाणाऱ्या लोकांना इतकं का बरं डोळ्यावर धरलं जात असेल ह्याचा विचार केला असता त्यांच्या वरिष्ठ असण्याचाच अर्थ कुणीतरी कनिष्ठ आहे आणि ते चेपले जातात हेच आहे. सगळेच थोर समजले जाणारे लोक वाईट असतात असं मी म्हणत नाही पण मेजोरीटीने ह्या लोकांच्या एकंदरच वर्तणूक आणि बॉडी लँग्वेज मध्ये स्वतःला वेगळं आणि विशेष समजणे दिसूनच येतं. सुपीरिओरिटीचा एक प्रकारचा माज अशा लोकांच्या चालण्याबोलण्यात असतोच त्यामुळे हे लोक टीकेचे धनी होतात. ह्याच सुपिरिअर लोकांमधले काही जण बिनकामाचे ह्या सगळ्या टीकेचे लक्ष्य होतात किंवा मोठेपणाच्या ह्या अवजड ओझ्याखाली दबून जातात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे पुरुष असणं, पुरुष असणं म्हणजे जणूकाही पाप आहे अशातऱ्हेनं पुरुषांना लिहिलं, बोललं जातं. महिलांवर होणाऱ्या अन्याय , अत्याचाराविषयी लिहिताना समस्त पुरुषवर्ग जणूकाही बलात्कारी, जुलूमजबरदस्ती करणारा, अमानुष असा रंगवला जातो आणि नकळतपणे मी चपापुन जाते. लहानपणापासून माझ्या भोवती असणारे पुरुष असे नाहीत मग पुरुषांचं हे एकांगी रेखाटन मला खटकत जातं. माझा बाप, भाऊ, नवरा, मित्र असे जुलमी नाहीत मग सगळ्या पुरुषांना कायमच कोलत रहाणं मला तरी नाही आवडत.

पुरुषप्रधान संस्कृतीत नाही म्हटलं तरी ही मोठेपणाची ओझी पुरुषाला वहावी लागतात, मर्द को दर्द नही होता हे सगळ्यात भंपक आणि टुकार वाक्य. पुरुष असला तरी आधी तो माणूस आहे, माणूसपणाच्या सगळ्या संवेदना त्याच्याकडे असतातच. तो आनंदी होतो, दुःखी होतो, कष्टि होतो. बाई आपल्या आनंदाचं आणि दुःखाचं प्रदर्शन मनसोक्त करते, ही एकप्रकारे चैनच आहे... अशी ऐश पुरुषाला नाही करता येत. आनंद झाला तर तो त्याला एन्जॉय तरी करता येतो पण दुःखं, वेदना जाहीर करण्याचा पुरुषाचा हक्कच ही पुरुषप्रधान संस्कृती हिरावून घेते. वेदनेत, त्रासात, दुःखात ढसढसून रडणारा पुरुष म्हणजे दुर्मिळ जीव. आपल्या घरातील स्त्रियांना सांभाळणे , त्यांची काळजी घेणे, त्यांची दुःखं हलकी करताना त्यांना रडायला खांदा देणे ह्यात सहृदय पुरुष इतके जखडून जातात की त्यांच्या स्वतःच्या भावना व्यक्त करणं ते जणू विसरूनच जातात. ही दबलेली घुसमट मग त्यांना नैराश्याकडे घेऊन जाते, ह्यातूनच नशेच्या आधीन होणे उपजत असावं.

ऑफिसच्या आणि घराच्या ओढताणीत कधीतरी थकून मीही रडले आहे, मला नेहमीच प्रश्न पडतो माझ्याइतकंच थकणारे माझे सहकारी असं रडत असतील का...  स्टेशन,विमानतळावरून टाटाबायबाय करताना बायका डोळ्याला रुमाल लावताना झटकन दिसतात, आपल्या पोटचा गोळा सातासमुद्रापार पाठवताना बापाला रडू येत नसेल का... घरातील कोणी आजारी पडलं तर दवाखान्यात धावपळ करणाऱ्या पुरुषांना टचकन डोळ्यात पाणी आणावं वाटत नसेल का ... ह्या आणि अशा अनेकप्रसंगात पुरुष कमीच रडतात, समजा ते रडलेच तर लोक काय म्हणतील म्हणून लपूनछपून रडत असतील. पुरुषांचं हे मनमोकळं न रडणं व्यसन आणि इतर डिप्रेशनची कारणं आहेतच त्यापलीकडे जाऊन ही घुसमट त्यांना आत्महत्येपर्यंतही घेऊन जाते... ही पोस्ट वाचणाऱ्या तमाम पुरुषांना तुम्हीही माणूस आहात,  कुणी सुपरमॅन वगैरे नाही आहात हे सांगू इच्छिते... दुःखात आणि आनंदात तुमचं मन तुमच्या डोळ्यांवाटे मोकळं होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा मित्रांनो... 'मर्द को भी दर्द होता है' ही नवी म्हण आम व्हावी

Wednesday, 4 July 2018

झाकली मूठ

थोर लेखक, कलाकार लोकं आपल्या मनात घर करून असतात, त्यांच्या कलाकृती आपण आवडीने वाचतो. त्यांना नावाजतो, कौतुक करतो, डोक्यावरही घेतो. आपल्या मनात त्यांच्या बद्दल उत्तम अशी प्रतिमा तयार होते. पण काही काळाने त्यांची स्वतःची किंवा त्यांच्या बायकांची आत्मचरित्रे आपण वाचतो आणि आपल्या मनातल्या प्रतिमा धडाधड मोडकळीस येतात. आपल्या मनातल्या प्रतिमाभंजनाचे खापर आपण इतके दिवस मखरात बसवलेल्या लोकांवर फोडतो. एक आत्मचरित्र काय बाहेर येतं त्या कलाकारांची सर्वदूर बदनामी होते. ख्यातनाम आणि सगळ्यांचे लाडके लेखक पु.ल. देशपांडे आणि रणजित देसाई ह्या दोघांच्या विषयी अशीच लोकांची मनं गढुळली. नामदेव ढसाळ यांच्या बायकोचे आत्मचरित्र मी अजून वाचलं नाही पण तेही त्यांच्या खाजगी आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतेय असं ऐकिवात आहे.

इथे मला नेहमी प्रश्न पडतो की ही झाकली मूठ उघडली नसती तर समीक्षकानी कुणाला बरं नावं ठेवली असती, आपलं खरं रूप जगापुढे येऊ देणं म्हणजे आपल्या चुकांसाठी उठसुठ जोडे खाण्याची सोय तयार करून ठेवणं का ? मुळात आपण कुणाकडूनही अगदी कुणाकडूनही परफेक्ट असण्या वागण्याची अपेक्षा का करतो, आणि अशी अपेक्षा करणं योग्य का?  ते कलाकार आहेत, सेलिब्रिटी आहेत पण आधी ते माणूस आहेत, कुणी देवाचे अवतार किंवा अवलिया आणि चमत्कारि स्त्री पुरुष नाहीत. तुमच्या आमच्या इतकंच त्यांनाही चूका करण्याचा हक्क आहे. काही वेळा... न्हवे बरेचदा आपण आपला आणि इतरांचा चुका करण्याचा हक्कच मान्य करत नाही. चुकने ही सहजवृत्ती आहे, सराईतपणे आणि वारंवार केलेल्या घोडचुका आणि गुन्हेगारी वृत्ती मात्र ह्यात धरू नये.

खरंतर आपले खरे चेहरे जगापुढे आणू द्यायला मोठं धाडस लागतं, तुमचं आयुष्य उघड्या पुस्तकाप्रमाणे समोर ठेवलं तर त्याला चिकित्सा करून त्याचं पार खिळखिळ केलं जातं, ही दुनिया फार बाजींदी आहे ही तुम्हाला हसरे, परफेक्ट, बिनचूक मुखवटे घालायला भाग पाडते, मुखवटा हलला की भिंग घेऊन परीक्षण सुरू. अगदी मायक्रोस्कोप खालचा पॅरासाईट होतो तुमचा. तुमचं खरं रूप झेपत नाही जगाला म्हणून तुम्हाला आत एक बाहेर एक रहावंच लागतं. मोठेमोठे ह्यातून सुटले नाहीत , तुम्ही आम्ही तर सामान्य लोक... ह्या भीतीपायीच कित्येकजण आपल्या खाजगी गोष्टी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर शेअर करत नाहीत. सहजवृत्तीने, भावनेच्या भरात घडलेल्या सगळ्याच गोष्टी जगाच्या चव्हाट्यावर मांडायच्या लोकं टाळतात ...  आपली झाकली मूठ लाखाची हाच बाणा योग्य असावा

टीप- वेगवेगळ्या बाओपिक, आत्मचरित्रावरच्या काथ्याकुटीनंतर मला जे वाटलं ते लिहिलंय, ह्याचा संजूशी संबंध नाही 😛 हो नाहीतर सगळा फोकस तिकडे जाण्याचा धोका आहे 😉

Monday, 23 April 2018

अनाहत

युट्युब वर टाईमपास करताना असाच कधीतरी अनाहत पिक्चर बघितला, उलटसुलट विचारांचं वादळ घोंघाऊन टाकणारा पिक्चर म्हणजे अनाहत. मल्ल देशाचा राजा आणि राणी एकमेकांवर खूप प्रेम करत असतात पण त्यांना वारस नसतो म्हणून अमात्यसभेच्या निर्णयानुसार नियोग विधीस तयार होतात. राणीचा नियोग विधीस विरोध असतो पण अमात्य सभेच्या निर्णयापुढे राजा झुकतो आणि राणी ह्या दिव्याला सामोरी जाते. नियोगासाठी राणी धर्मनटी म्हणून राजवाड्याबाहेर जाऊन जमलेल्या प्रजाजनातून एकजण एका रात्रीसाठी उपपती म्हणून निवडणार असते. जाताना श्वेतवस्त्रे धारण केलेली अत्यंत नाराजीने गेलेली राणी परत येते तीच मुळी तृप्त शरीर घेऊन, ह्या तृप्तीच्या खुणा तिच्या शरीरावर स्पष्ट दिसत असतात. ह्या एका रात्रीच्या अनुभवावर ती खुश असते आणि हेच राजा आणि अमात्यांना खटकते. तिच्या सखीशी नियोगरात्रीबद्दल बोलताना राणी आसुसून बोलते, हे सुख असं होतं, असं असतं हे तू कधीच का सांगितलं नाहीस असंही ती सखीकडे विचारणा करते. एका रात्रीने मिळालेलं शरीरसुख पुन्हा मिळावे म्हणून त्रिवार संधीच्या मान्यतेनुसार राणी राजाज्ञा देते आणि पुन्हा राजाला दवंडी द्यायला लावते. हि झाली ढोबळ कथा, त्यात जाणवलेल्या काही गोष्टी

राणीने नाराजीने का होईना नियोग पत्करला कारण तिने जर विरोध केला असता तर राजा साथ देईल अशी तिला खात्री नव्हती. सखीशी बोलताना तिची खंत दिसून येते, "पत्नीपेक्षा राज्य श्रेष्ठ वाटलं त्यांना, करायचा होता विरोध, नाकारायचा होता नियोग आणि राजेपद" पण असं होत नाही. स्त्रीत्व डिवचलेली दुखावलेली राणी सोनाली बेंद्रेने परफेक्ट साकार केलीये.

षंढ सिद्ध झालेला राजा, पौरुषाचा अपमान तरीही वारसांची लालसा. राणी नियोगाला जाताना पांढरे कपडे घालतेय, दागिणे नाकारते हे ऐकून खुश झालेला पुरुष. राणी परत आल्यावर स्त्रीत्व, पवित्रता गेली म्हणून रडेल, नाराज असेल म्हणून तिच्या सांत्वनाला सज्ज असलेला राजा आणि अमात्य तिचे समाधान बघून सटपटतात. नियोग आटपून तिने लगेच परत फिरायला हवं होतं पूर्ण रात्र तिथे ती काय करतेय म्हणून त्रासलेल्या राजाला राणीने फक्त वंशवृद्धीसाठीच हा विधी करणे अपेक्षित होतं, राणी मात्र तिच्या स्त्रीत्वाचा जागर करून येते.

सिनेमाचा शेवट मात्र घाईत उरकल्यासारखा मलातरी वाटला, राणी लग्नापासूनच्या प्रेममय क्षणांची राजाला आठवण करून देते आणि ह्या क्षणांच्या सोबतीने उरलेलं आयुष्य आनंदात काढेन असं सांगते आणि बाहेर तिच्या पुढच्या नियोगविधीची दवंडी पिटली जात असते. अनंत नागने राजाची भूमिका केलीये, नेहमीप्रमाणे तो अप्रतिम. मला अंकुरपासून अनंत नाग आवडतो, सगळ्या भूमिका जिथल्या तिथे करतो तो, कुठेही अति नाही की कमी नाही. नेहमी काहीतरी हटके घेऊन येणाऱ्या अमोल पालेकरांचा हा मराठी सिनेमा कोणतेही मत न देता ह्याचं इंटरप्रिटेशन प्रेक्षकांवर सोडतो.

स्त्रीच्या म्हटलं तर लहान म्हटलं तर मोठ्या अपेक्षा ह्यात दाखवल्यात, पती ठाम सोबत असता तर कदाचित राणीची पुढची वाटचाल वेगळी असती का ?
पती आपल्याला गृहीत धरून नको ते कृत्य करायला लावतोय हे समजून ती गोष्ट जबाबदारी म्हणून पार पाडताना त्यात रमणारी राणी योग्य की अयोग्य?

माझ्याकडे तरी ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, अजून खूप प्रश्न पडलेत परंतु लेखनमर्यादा ...

#अर्चना

Friday, 13 April 2018

तो काय करत होता

#असिफा 8 वर्षांची मुलगी, तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून ज्या निर्दयतेने हे सगळं घडलं ते बघता अनेक प्रश्न मनाला पडले. सुरवातीला काही काळ सुन्न अवस्थेत बसून राहिले आणि नंतर मनात न थांबणारे वादळ सुरु झाले, ते वादळ जसंच्या तसं लिहायचा एक प्रयत्न

असिफा मुस्लिम मुलगी आणि बलात्कारी हिंदू , त्यातून हि घटना घडली तीच मुळी भारताच्या अतिसंवेदनशील जम्मू काश्मीरमध्ये मग ह्या घटनेला राजकीय धार्मिक वळण लागणारच होतं. सगळे हिंदू वाईट नसतात आणि सगळे मुसलमान अतिरेकी नसतात पण अशा घटना समाजकंटकाना एकमेकांबद्दल राळ उडवायला उपयोगी पडतात. आपल्याकडे मुसलमान आणि दलितांबद्दल सहानुभूती लांगुलचलन ठरते आणि हिंदूंबद्दल मात्र गर्व, अभिमान असतो. मला स्वतःला लांगुलचालन आणि गर्व, अभिमान ह्या सगळ्या गोष्टींचा तिटकारा आहे, सगळे समान आणि समान दर्जा हेच माझं धोरण असते. असो ह्या मुद्द्याचा कितीही काथ्याकूट केला तरी त्यातून निष्पन्न काहीच होत नाही , म्हणून ह्या विषयाला इथे विराम

जेव्हा मी लहान मुलींवरील बलात्काराच्या बातम्या ऐकते तेव्हा मला नेहमीच प्रश्न पडतो ह्या लोकांचं हे धाडस झालंच कसं. कुठलीही पिलं अगदी कुत्र्या , डुकराची पिलंही गोंडस गोजिरवाणी दिसतात, त्यांना बघून माया, वास्तल्य, कौतुक दाटून येतं मग ही माणसं अशी कशी बरं बनली असतील की ज्यांना लहान लेकरं बघून ह्यांचे अवयव वळवळू लागतात. अगदी तान्ह्या मुलीपासून ते म्हाताऱ्या वयोवृद्ध स्त्रियांवर बलात्कार होतात. ह्या पुरुषांच्या मानसिकतेचे आकलन माझ्या अल्पमतीला अद्याप झाले नाही, ह्यावर एकंदरच शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास होणं अत्यंत गरजेचे आहे. ह्या मनोवृत्तीच्या लोकांना तर मग कुत्री , मांजरही पुरत नसेल किंवा अगदी निर्जीव बाहुलीशीही चाळे करत असतील. हा एक आजार आहे, ह्याचा इलाज व्हायलाच हवा. आरोपींना नंतर पश्चाताप होत असेल का बरं? हिट ऑफ मुमेन्टमध्ये डोकं आणि शरीर तापलेले असताना अशा घटना घडून गेल्यावर त्यांना लज्जास्पद आणि खजील तरी वाटत असेल का?

देवळात पोरीवर अत्याचार होताना… “तो काय करत होता” किंवा “देव असता तर…” अशी वक्तव्य ऐकू यायला लागली. मी स्वतः नास्तिक की आस्तिक हा माझा स्वतःचा प्रचंड वैचारिक घोळ असतानाही मला देव हि संकल्पना आवडते. माझ्या काही श्रद्धा आहेत पण कर्मकांडाला माझा प्रखर विरोध आहे. दिसला देव की जोडा हात आणि वहा कुंकू,फुले अशी मी नाही. मला देवळातल्या देवापेक्षा माणसाच्या मनातला देव जास्त आवडतो. देव शिक्षा करतो, पाप लागतं म्हणून चुकीच्या गोष्टी टाळणारी भाबडी लोकं मला फारफार आवडतात… त्यांच्या मनातला देव त्यांना पाप करू देत नाही. इथे तर देवळातच बलात्कार झाला मग देव ह्यांच्या मनातून तर कधीच वस्ती उठवून गेलेला दिसतोय. तो तिथे नाहीच तर “तो काय करत होता” अशी पृच्छा करणेही व्यर्थ.

देवा,

जर तू असशीलच कुठे तर अशा अतृप्त लोकांच्या मनात रहा रे बाबा. तुझा धाक त्यांना वाटेल असं काही करच तू त्यांना. तुझ्या काठीला आवाज येऊ दे यार. “तो बघतोय” ते “तो काय करत होता” हा तुझा प्रवास मला अजिबात आवडला नाहीये… ये धावून, दाखव तुझे अस्तित्व आणि “तो बघतोय” असा तुझा दरारा कायम कायम राहू देत