Wednesday, 10 May 2017

पुन्हा एकदा

बसेल का गाठ पुन्हा एकदा
मिळेल का ती साथ पुन्हा एकदा

आली झुळूक हळुवार कोवळी
होईल का बरसात पुन्हा एकदा

रखरखीत उन्हे अशी तापलेली
दिसेल का मखमल पुन्हा एकदा

काल तुझी साद दुरून आली
येशील का कवेत पुन्हा एकदा

दोन ध्रुवावरची दोन जगे ही
होतील का सोबती पुन्हा एकदा

हसणे असणे बोलणे रुसणे दिसणे
करशील का छळवाद पुन्हा एकदा


Sunday, 23 April 2017

अहिल्या

पंचकन्या मधील एक, ब्रम्हदेवाने स्वतः निर्माण केलेली जगातील सर्वात सुंदर स्त्री. उर्वशीला आपल्या सौन्दर्याचा गर्व झाला म्हणून तिच्याहून सुंदर स्त्री निर्माण करण्यासाठी अहिल्या बनवली गेली असाही उल्लेख आहे. अहिल्या अयोनीज समजली जाते म्हणजे ती जन्माला आली नाही तर तिला निर्माण केलं किंवा मूर्ती घडवतात तशी घडवली. तिच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा आहेत.

अहिल्या जगातील सर्वांग सुंदर स्त्री, ब्रम्हाने मोठी होईपर्यंत गौतम ऋषीला सांभाळ करायला दिली...गौतम ऋषीने ती वयात आल्यावर ब्रम्हदेवाच्या स्वाधीन केलं...ऋषींनी मुलीला नीट सांभाळले , सुखरूप परत केले म्हणून त्यांच्या नैतिकतेवर, नितीमत्तेवर खुश होऊन ब्रम्हदेवाने अहिल्येचा विवाह तिच्याहून वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या गौतम ऋषींशी करून दिला. जगातील सुंदरी आपल्यासाठीच निर्मिल्या जातात असा समज असलेला इंद्र या लग्नामुळे नाराज होतो आणि तप करण्यासाठी निबिड वनात निघून जातो.

अहिल्या आणि गौतम ऋषींच्या विवाहाबद्दल अजूनही एक कथा आहे ज्यात तिचा लहानपणी सांभाळ कुणी केला याबद्दल वरती उल्लेख केला तसंच आहे फक्त तिच्या विवाहासाठी ब्रम्हदेव एक पण ठेवतात , त्यांच्या पणानुसार जो तिन्ही लोकांना सर्वप्रथम फेरी मारेल तो अहिल्येला जिंकून घेईन. इंद्र आपल्या जादुई चमत्कार करून आधी पण पूर्ण करतात , दरम्यान नारद येऊन ब्रम्हदेवास सांगतात की इंद्राच्या आधी गौतम ऋषींनी पण पूर्ण केलाय आणि म्हणून अहिल्या त्यांनी जिंकली. गौतम ऋषींनी बछड्यास जन्म देत असलेल्या सुरभी गाईला फेरी मारली, गाईला प्रदक्षिणा म्हणजे तिन्ही लोकांना फेरा घातला अशी मान्यता असल्याने गौतम ऋषींनी पण जिंकला असं नारद सांगतात. कशाप्रकारे का असेना अहिल्याचा विवाह तिच्यापेक्षा वयाने खूप जास्त असलेल्या गौतम ऋषींशी झाला हे मात्र खरे आणि या विवाहाने इंद्राला मत्सर आणि क्रोधाग्नीत लोटले हेही खरेच. (गौतम ऋषी आणि अहिल्या यांच्यातील संबंध कसे होते हे मला कुठेही वाचायला मिळालं नाही)

लग्नानंतर अहिल्या गौतम ऋषींच्या आश्रमात राहू लागली जो एका नदीकाठी वसलेला होता (एक ठिकाणी मिथिलानगरीजवळ असा उल्लेख आहे). इंद्र अहिल्येच्या रूपाच्या पुरता वश होता, तिच्या जवळ जाण्याची तो संधीच बघत होता. एके दिवशी ऋषी आश्रमात नाहीत असं बघून तो गौतम ऋषींच्या रुपात अहिल्येसमोर हजर झाला. इंद्राने अहिल्येकडे शरीरसंबंध ठेवण्यासाठी मागणी केली आणि प्रेमाराधना केली. एव्हाना अहिल्येने समोर गौतम ऋषींच्या रुपात इंद्रदेव आहे हे ओळखले होतेच तरीही ती त्याला समर्पित झाली. काही कथांमध्ये अहिल्येने इंद्रास सुरवातीला नकार दिला परंतु देवांच्या इच्छेची तृप्ती करणे ही तिचे कर्तव्यच आहे असं सांगून इंद्राने तिचं मन वळवल्याचे सुद्धा सांगण्यात येतं. कशाही तऱ्हेने का असेना इंद्राने अहिल्येचा उपभोग घेतला हे मात्र सगळ्या कथांमध्ये मान्य केलं गेलंय. तिकडे गौतम ऋषींना सगळा प्रकार आंतरज्ञानाने समजतो आणि ते ताबडतोब आश्रमात येतात. अहिल्या आणि इंद्र यांच्या प्रणयाचं वर्णन वाचून एक गोष्ट लक्षात येते की इंद्राने तिच्यावर अत्याचार केले नाहीत. रतीसुखात दोघेही सारखेच सहभागी होते. त्या दोघांनीही रतीसुखाचा अपार आनंद उपभोगला इतका की शेवटी ते दमून थकून नदीच्या काठी झोपी गेले असाही उल्लेख आहे. गौतम ऋषी हे सगळं बघून ते अर्थातच संतप्त झाले आणि त्यांनी पळून जाणाऱ्या इंद्राला शाप दिला की तुझे दोन्ही वृषण कुचकामी होतील (या शापातून इंद्र कसा मुक्त झाला याची मला माहिती नाही) आणि अहिल्येला तू यापुढे जगाच्या नजरेस पडणार नाहीस एक गुमनाम होऊन म्हणजेच दगड होऊन पडशील असा शाप दिला त्यासोबतच श्रीराम जेव्हा तुला भेटतील तेव्हा तुझा उद्धार करतील असा उ:शाप दिला. अहिल्येला शतनंद नावाचा एक पुत्र झाला जे की नंतर मिथलेच्या दरबारी पुजारी होते.

आयुष्याच्या सुरवातीपासून कायम पुरुषी वर्चस्वाखाली राहिलेली अहिल्या फक्त एकदाच स्वतःच्या मनाप्रमाणे वागली आणि त्याचं फळ म्हणून तिला जगापासून दूर रहावं लागलं. उद्धार करायला पुन्हा एकवार पुरुषाचीच गरज लागली. तिने आयुष्य कुठे कंठावे, कुणासोबत विवाह करावा यात कधीही तिचं मत घेण्यात आलेलं नाही. एका दिवसाच्या आनंदाची मात्र जबरी किंमत तिला चुकवावी लागली. घरोघरच्या अहिल्यांबाबत अजूनही परिस्थिती तीच आहे इतका कशाचा पगडा समाजमनावर असावा बरं ?

(टीप - वेळोवेळी वाचलेल्या पौराणिक कथांचा आधार घेऊन वरील लिखाण लिहिलं आहे, याव्यतिरिक्त दुसरी माहितीही असू शकेल हे मला मान्य आहे)

Sunday, 16 April 2017

रणछोडदास

जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या दाराशी उभं आहे की काय अशी परिस्थिती आहे. जगातले जवळजवळ सगळेच पॉवरबाज नेते जहाल विचारसरणी बाळगून आहेत. युद्ध हे कधीही स्वागतार्ह नसतं, त्याचे परिणाम जेते आणि पराजित दोघांनाही सारखेच क्लेश देणारे असतात. आपला शेजारी सारख्या लहान मोठ्या कागळ्या करतच असतो तेव्हा आपले अतिउत्साही लोक आता ह्यांना धडा शिकवलाच पाहिजे म्हणून बाह्या सरसावून पोस्टि पाडत असतात. मी स्वतः हिंसेच्या विरोधात आहे पण तरीही गरज पडल्यास आपण सक्षम आणि सामर्थ्यवान असलंच पाहिजे याबद्दल माझं दुमत अजिबातच नाही. युद्ध नको आणि त्यामुळं होणारी अपरिमित हानी नको म्हणून श्रीकृष्णाने केलेले प्रयत्न कृष्ण शिष्टाई म्हणून ओळखले जातात, अर्थात त्याच्या प्रयत्नांना यश आलंच नाही त्याची निष्पत्ती म्हणून मोठा विनाश झाला. याआधी सुद्धा कृष्णाने युद्ध टाळण्यासाठी मथुरा सोडली होती आणि द्वारकेला मुक्काम हलवला होता,मथुरेतून पळ काढला त्यामुळे श्रीकृष्ण रणछोडदास म्हणूनही ओळखला जातो. श्रीकृष्ण माझा ऑल टाइम फेवरेट असण्यामागचं कारण हेहि आहेच, की तो नेहमी प्रॅक्टिकली वागत आला. अत्यंत मुत्सद्दीपणे जेव्हा जेव्हा जेजे योग्य ते त्याने केले. श्रीकृष्णाने केलेल्या जादुई गोष्टींकडे मी नेहमीच कानाडोळा करत आलेय त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. पण त्याच्या प्रॅक्टिकल , वेळच्या वेळी घेतलेल्या अचूक निर्णयाची तर मी अक्षरशः फॅन आहे. त्यातलाच एक निर्णय मथुरा सोडण्याचा.

तर त्याचं झालं असं, मगधराज जरासंध हा कंसाचा सासरा, कृष्णाने कंसाला मारल्यानंतर त्याच्या दोन्ही मुली अस्ति आणि प्राप्ती विधवा होतात, कंसाच्या वधाची बातमी ऐकून आणि आपल्या दोन्ही लेकींची अवस्था बघून जरासंध जाम खवळतो. कृष्णाला चांगलाच धडा शिकवायचा आणि यादववंशाचा नाश करायचा हा पक्का निर्धार जरासंध करतो. जरासंध मथुरेवर एकामागोमाग एक असे 17 हल्ले करतो. मथुरेची जिवीत आणि वित्त हानी चिक्कार होते. या हल्ल्याना तोंड देऊन यादवांचा खजिना रिक्त होऊ लागतो. जरासंधाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्धसामुग्री असते, यादवांकडे कृष्ण बलराम असूनही त्यांची ताकद कमी पडू लागते. अशातच एक दिवस मथुरेत निरोप येऊन धडकतो की जरासंध, छेदिनरेश दमघोष,  कुकुसेचा दत्वरका,  विदर्भराज रुक्मि,  अवंतीतील विंद आणि अरविंद हे भाऊ असे सगळे एकत्र झाले आहेत आणि यादववंश संपविण्यासाठी सज्ज झाले आहेत. हस्तिनापुराहून कसलीही मदत शक्य नसते. यादव एकटे पडतात म्हणजे एकटे पाडले जातात. मथुरानरेश उग्रसेन जे कृष्णाचे आजोबा असतात त्यांना जरासंध निरोप पाठवतो की फक्त कृष्ण बलराम आमच्या स्वाधीन करा मी या संकटातून तुम्हाला मुक्त करतो. उग्रसेन महाराज ही गोष्ट कृष्णाच्या कानावर घालतात. कृष्ण म्हणतो आपण मथुरा सोडून जाऊ. या परिस्थिती युद्ध करणं म्हणजे आत्मघात, यादवकुळ वाचवायचं असेल तर मथुरा सोडण्याशिवाय पर्याय नाही. उग्रसेन म्हणतात आपण जाऊ पण तुला पळपुटेपणा केला ह्याच खापर हा कलंक कायम घेऊन जगावं लागेल. कृष्ण म्हणतो मला पळपुटा म्हणू देत, रणांगणावरून युद्धाच्या आधीच पळालेला रणछोड समजू देत, मला आधीच असंख्य नावं आहेत, अजून त्यात एका नावाची भर.

जरासंधाची ताकद, त्यातुलनेत यादवांची दुर्बलता या गोष्टींमुळे कधीना कधी मथुरा सोडावी लागणार याचा कृष्णाला अंदाज होताच त्यामुळे त्याने विश्वकर्मा यांच्या कडून अगोदरच एक नगर बनवून घेतलं होतं ते म्हणजे द्वारका. द्वारका पाण्याखाली होती मग ती विश्वकर्माने वर आणली वगैरे गोष्टी सांगितल्या जातात ते असो. मथुरा सोडून सगळे यादव द्वारकेस निघून गेले, जरासंध आला तेव्हा त्याला मथुरेत काळं कुत्रंही दिसलं नाही. मथुरेतून पलायन केलं म्हणून श्रीकृष्णाला रणछोडदास हे नाव मिळालं ते मिळालंच , कृष्णाच्या इतर नावांप्रमाणे हे नावही गोड आणि सुंदरच आहे

(टीप- मी कुणी अभ्यासक नाही. इकडे तिकडे वाचलेलं आठवेल तसं माझ्या भाषेत लिहिलंय)

Friday, 7 April 2017

ढाल

जरा रगील होती जरा नशील होती
रंगीन इमारतही जरा घरंदाज होती

मोडून चौकटीना धावली सुसाट होती
गाडी पटरीवरून जरा उतरली होती

जरा कुलीन होती थोडी शालीन होती
चाल तिची जराजरा चवचाल होती

घट्ट लपेटल्या पदरात तेज आग होती
झाकून पाकून तरी अंतरात जाग होती

न्हवती दिनवानी कहाणी अपूर्ण होती
मोडल्या संसाराची खंबीर ढाल होती


Monday, 3 April 2017

भाव

ह्या फुलाचा गंध वेगळा
तू त्याला स्पर्श केला

आज नव्याने घडले काही
धडा तसा जुना वाचला

वाड्याचे खांबही तुटले
एक चिरा पुन्हा निखळला

आशावादाची राखरांगोळी
दिवा फडफडून विझला

तू म्हणाला दूर जाऊ
पसारा इथला मी आवरला

अश्रूंना किती टाळावे
गहिवर होता आत कोंडला

तुला वाटते मी बदलले
रंग तुझाहि बदलला

संसाराचे वस्त्र देखणे
अस्तराचा पोत विरला

कुणी कशावर किती मरावे
समजूनही जीव झुरला

जगी व्यर्थ सगळे नश्वर
तुक्याचा भाव तरला


Thursday, 30 March 2017

रोमिओ ज्युलियेट



काही दिवसांपूर्वी रोमिओ स्कॉडवरून दोन पोस्ट टाकल्या, म्हणून रोमिओज्युलियेट प्रेमकथेविषयी लिहावं असं मनात आलं. या विषयावर खूप लिखाण झालं आहे, आपण खूपसे वाचलही असेल,तरी हा एक छोटा प्रयत्न. रोमिओ ज्युलियेट हे नाटक शेक्सपियरच्या सुरवातीच्या काळातील लिखानापैकी आहे. हे नाटक त्याने लिहिलं तो काळ साधारणपणे इसवीसन 1591-1595 असा मानण्यात येतो. हे कथानक इटालियन दन्तकथा वरून बेतलेले आहे.

***

वेरोना शहरात हि गोष्ट घडते, त्या शहरातली दोन मोठ्ठी नावाजलेली कुटुंबं असतात, एक मॉन्टेग्यु कुटुंब आणि दुसरं केपुलेट कुटुंबं, दोन्ही कुटुंबात पिढीजात वैर असतं, टोळीयुद्ध सदृश परिस्थिती सारखीच येत असते, दोन्हीकडच्या माणसांना एकमेकांबद्दल प्रचंड राग असतो. मॉन्टेग्यु परिवाराचा रोमिओ हा जवळचा मित्र, त्यान्च्या टोळीत स्थान मिळवून असलेला. एकदा मॉन्टेनग्यू कुटुंबात मुखवटे घालून नृत्य करायची पार्टी असते, तिथे ज्युलियेट हि केपुलेट कुटुंबातली 13 वर्षीय सुंदरी येते. नृत्यादरम्यान तरणाबांड रोमिओ आणि लावण्याखणी ज्युलियेट एकमेकांकडे आकर्षित होता, दोघेही एकमेकांच्या नजरेत गुंतून पडतात. नृत्य संपल्यावर सगळे आपापल्या घरी निघून जातात. हा इकडे आणि ती तिकडे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, दुराव्यामुळे अजूनच टोचत असलेली सल. दोघेही एकमेकांसाठी तडफडत असतात, कसंही करून ज्युलियेटला आपलं प्रेम व्यक्त करायचंच असा निग्रह करून एक दिवस रोमिओ धाडस करतोच आणि तिच्या खाजगी दालनातल्या गच्चीत बाहेरच्या भिंतीवरून चढतो.रोमिओला गच्चीत अचानक बघून ज्युलियेट गडबडते, लाजते तिचे लज्जित रूप बघून रोमिओ घायाळ होतो आणि आपल्या ओठांनी तिचे ओठ टिपून घेतो. तिच्या कानात तिच्या बद्दलच्या आपल्या भावना प्रेम व्यक्त करून रोमिओ आल्यामार्गे परत जातो. दोघेही खूप अल्लड बालिश असतात आणि एकमेकांच्या प्रेमात बुडालेले,प्रेम न जाणते जगाची रित म्हणून दोघेही गुपचूप जवळच्या चर्चमध्ये जाऊन लग्न करतात. प्रेमाचा पहिला स्पर्श झाल्याने आनंदित ज्युलियेट आणि तिच्यासोबत भावी आयुष्याची स्वप्नं बघणारा रोमिओ ह्यांना आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय हे माहीतच नसतं.

प्रेमाच्या भावविश्वात गुंतलेले जीव जमिनीवर आणायचं काम लगेच होतंच. दोन्ही कुटुंबात परत वादावादी सुरु होते, गोष्टी हाणामारीपर्यंत जातात त्यात रोमिओचे जिवलग मित्र मारले जातात. डोक्यात राख घालून रोमिओ बदला घ्यायच्या नादात ज्युलियेटच्या चुलत भावाचा खून करतो. खुनाची शिक्षा म्हणून रोमिओला वेरोनातून तडीपार केलं जातं. इकडे ज्युलियेटशी विवाह करण्यास काऊंट पॅरिस इच्छुक असतो तो तिच्या घरच्या लोकांना तशी गळ घालतो, पॅरिसचं खानदान, वैभव बघून ज्युलियेटचं पॅरिस सोबत लग्न ठरवण्यात येतं. तडीपार झालेला रोमिओ ज्युलियेटच्या आठवणींनी कासावीस होतो, तिच्या आठवणी काढत तिचं नाव घेत तो शहराभोवती वेड्या सारखा फिरत रहातो. इकडे पॅरिससोबत लग्न ठरल्याने कासावीस ज्युलियेट यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधू लागते, लग्नाची तारीख जवळ येते तसा तिचा गोंधळ अजूनच वाढतो. लग्नाचा दिवस उजाडतो, ज्युलियेटने गुपचूप झोपेचं औषध मागवलेलं असतं ते घेऊन ती झोपून रहाते,तिला बिचारीला वाटतं की ती बेशुद्ध असताना ती मेली असं समजून तिचं लग्न रद्द होईल.

तिला गाढ बेशुद्ध बघून ती गतप्राण झाल्याची अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरते, हि बातमी रोमिओला समजल्यावर त्याचा जीव रहावत नाही, तो सगळे नियम धुडकावून शहरात घुसतो आणि धावतच ज्युलियेटच्या घरी धडकतो. ज्युलियेटला त्या अवस्थेत बघून रोमिओ वेडापिसा होतो, तिच्या कपाळाचे,ओठांचे शेवटचे चुंबन घेऊन तो जवळचं जहाल विष प्राशन करतो. विष घेतल्यावर थोड्यावेळातच रोमिओ मरतो. इकडे गुंगीच्या औषधाची धुंदी उतरून ज्युलियेट शुद्धीवर येते. रोमिओला मृत बघून ज्युलियेटच्या दुःखाला पारावर रहात नाही, ती धाडकन त्याच्या शरीरावर पडून विलाप करते. रोमिओशिवाय पुढे जगणं नको म्हणून ज्युलियेट रोमिओच्या कमरेचा चाकू काढून स्वतःला भोसकुन घेऊन जीवाचा अंत करते. अशा रीतीने दोन प्रेमी जीव या जगात नाही तरी परलोकात एकमेकांच्या सहवासात रहातात. या दोन प्रेमिकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्याचे डोळे उघडतात आणि दोन्ही कुटुंबातील दुष्मनी संपते

Sunday, 26 March 2017

श्रमप्रतिष्ठा



वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेलं, वाचलेलं एकत्र करून माझ्या शब्दात लिहीलं आहे

***
एका कारखान्यात मोठीच्या मोठी यंत्र असतात, सतत 3 शिफ्ट मध्ये कारखान्यात काम सुरु असायचं. यंत्र म्हटलं की ती बिघडणारच, त्या यंत्रावर काम करणारे कामगार छोट्या मोठ्या दुरुस्त्या करण्यात चांगलेच हुशार झाले होते.तरीही...तरीही एकदा एक महत्वाचं यंत्र बंद पडतं, सगळं काम ठप्प होतं. कामगार त्यांना जमेल तशी पळापळ करून यंत्र दुरुस्त करायचा प्रयत्न करतात पण परिस्थिती जैसे थे. शेवटी अतीव नाईलाजाने एका इंजिनीयरला दुरुस्ती साठी बोलावण्यात येते. इंजिनियर येतो यंत्राकडे थोडावेळ बघतो आणि एका हाथोड्याने एका ठिकाणचा खिळा ठोकतो. झालं यंत्र एक मिनीटात परत सुरु होतं. कारख्यानाचा मॅनेजर इंजिनिअरला त्याच्या कामाचं बिल किती झालं विचारतो आणि त्याची रक्कम चुकती करतो. सगळे कामगार एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात कारण इंजिनिअरच्या बिलाची रक्कम कामगारांच्या पगारापेक्षाही जास्त असते. न राहवून एक कामगार विचारतोच 'काय केलं या माणसाने असं , एक खिळा तर ठोकला आणि त्यासाठी त्याला इतके पैसे कशासाठी द्यायचे, आम्ही मरमर महिनाभर काम करतो तेव्हा कुठं पगार हातात मिळतो तोसुद्धा इतका नसतो' इंजिनिअर त्याला उत्तर देतो 'मित्रा , मी हे पैसे खिळा ठोकण्याचे घेतलेलं नाहीतच तर कुठला खिळा ठोकला म्हणजे यंत्र सुरु होईल या ज्ञानाचे घेत आहे'

कष्टाचा मोबदला कमी असतो हे सत्यच आहे. कुठलीही संस्था किंवा संघटना यामध्ये व्यक्ती जितका वरच्या पदावर तितकं त्याला अंगमेहनतीचे काम कमी करावे लागते आणि निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग वाढतो. निर्णय घेणे, अंमलबजावणी करून घेणे तसेच कामाचे कार्यक्षेत्र वाढते , कक्षा वाढतात. म्हणजेच कम्पणीचा मालक स्वतः फार कष्टाची कामं करत नसतो, ac केबिन मध्ये बसून रहातो त्याचं काम कम्पनीची धोरणं ठरवणं त्यानुसार हाताखालच्या लोकांकडून ते काम करून घेणं, संपूर्ण कंपनी हि त्याची जबाबदारी असते. कामगार ठरवून दिलेलं काम ते तेवढंच तो करतो इतर ठिकाणी लक्ष द्यायची त्याला गरज नसते पण तुलनेत श्रम जास्त आणि मोबदला मात्र खूपच कमी असतो.

सध्या जगात सगळीकडे हेच चित्र बघायला मिळतं. शेतकरी काबाडकष्ट करतो परंतु त्याच्या हातात फारसं काही पडत नाही त्याउलट उच्चपदस्थ अधिकारी, बिझनेसमेन, डॉक्टर्स, इंजिनिअर तुलनेने अंगमेहनत कमी करूनही भरपूर पैसा कमावतात आणि सुखवस्तू जीवन जगतात. शिक्षण घेणे, एखाद्या क्षेत्रात प्राविण्य मिळवणे हेच सध्यातरी आपल्या हातात आहे. श्रमाला प्रतिष्ठा हवी , कष्टाची लाज नसावी इत्यादी फक्त पुस्तकात वाचायला भाषणात बोलायची वाक्य म्हणून बरी आहेत. खऱ्या जगात श्रमाला म्हणावं असं यश, पैसा नाही असेच मला तरी वाटतं