Monday, 5 March 2018

हँडल विथ केअर

पार्सलवर वाचलंय ना बरेचदा … हँडल विथ केअर, नाजूक काचसामान असतं आतमध्ये… धक्का लागून फुटू नये म्हणून थर्माकोल, पेपर्स आणि कायकाय गुंडाळून पॅक करतात… खूप जपावं लागतं, सुरवात ते शेवट नुसती जपणूक करा… जर्रासं दुर्लक्ष आणि खळकण फुटलंच समजा… काही नातीही अशीच असतात, आणि माणसंही… थोडं बिनसलं कि पटकन रुसणारी, फुटणारी... ह्यांना केअरफूलली हँडल करूनही एखादा कपाचा कान तुटतोच… मग त्याला दिवाणखाना वर्ज्य होतो… अगदी नाईलाज झाला तरच हे कानतुटके कामाला येतात

रस्त्यावरून जाणारे डिझेल, पेट्रोल आणि एक्सप्लोजिव्हचे मोठमोठे ट्रक्स असतात... मागे लिहिलेय असतं डेंजर… जिवंत बॉम्ब असतात ह्या गाड्या… धडकलं कि स्वतःचा आणि दुसऱ्याचा नायनाट करणाऱ्या… अशीच काही लोकं आणि नाती, गच्च दारुगोळा भरूनच असतात… धुमसणारे सुप्त ज्वालामुखी जणू… तुम्ही आपटा किंवा ते तुमच्यावर आपटोत भडका ठरलेला… हानी होणार हे एकशेएक टक्के खात्रीशीर… मग ओघाने आलंच ड्राइव्ह विथ सेफ डिस्टन्स

काही नमुने लोखंड, अल्युमिनियम, पितळ, तांब्या आणि स्टेनलेस स्टीलचे… कितीही आपटा, धोपटा, पोत्यात भरा, माळ्यावर टाका, मोडीत काढा… तरीही हुं कि चुं न करणारे, ब्र निघतच नाही… ठोकलं, पोचे पडले तरी उपयोगी… अगदी कुणी मुद्दाम छंनी, हातोडा घेऊनच ठोकलं तर भोकं पडणारी… दुःखं, वेदना पचवण्याची दुर्दम्य ताकत बाळगून असणारी भांडी, हीच संसारोपयोगी

नाजूक बिल्लोरी काचकाम मन भुलवतं… जप जप जपावं लागतं, आगडोंब धगधगणारे ज्वलंत प्रकार भीती दाखवतात, सुरक्षित अंतर राखून असावं नाहीतर जाळून खाक करतात… अतिसामान्य, रोजच्या वापरातल्या वस्तूच आशादायक वास्तव...लंबी रेसके घोडे… कुठेही फेकलं तरी चार पायावर उभ्या रहाणाऱ्या मांजरासारखी

Monday, 26 February 2018

इश्यू नॉनइश्यू

दोन दिवसात तीन घटना घडतात,

एक प्रसिद्ध नटी अकस्मात हे जग नैसर्गिकरित्या सोडते तेही भारतभूपासून दूर कुठेतरी परदेशात. तिचे लाखो चहाते आहेत त्यांना वाईट वाटणं सहाजिक आहे. क्लासेस पासून मासेस पर्यंत दुःखं हळहळ व्यक्त केली गेली. खुपजनांना आपले टिनएज, कॉलेजचे दिवस आठवले. पहिलं प्रेम, ती हुरहूर, तिचे सिनेमे, तिचे नृत्य सगळं सगळं आठवून लोक हळवे झाले. मोहम्मद रफी गेले तेव्हा आईला मी ढसाढसा रडताना बघितलंय, त्यामुळे पोस्टींचा पाऊस आणि त्यातून जाणवणारा गहिवर मी समजू शकते. मला स्वतःला हे अजिबात खटकलं नाही, मी एकही पोस्ट लिहिलं नाही खरंतर मलाही वाईट वाटलं होतं पण दरवेळी व्यक्त व्हायलाच हवं असं काही नाही म्हणून नाही लिहिलं. पोस्टींचा पावसात काही बेडूक उलटेहि पोहून गेले अगदी अति झालं पासून तिचे समाजात योगदान काय इथंपर्यंत चर्चा झाली, हेहि ठीक आहे ती त्यांची अभिव्यक्ती म्हणून आपण मान्य करू पण काही पोस्टवर अगदी खालच्या थरातल्या कमेंट्स आल्या, तिच्या चारित्र्याबद्दल लिहिलं गेलं,तिच्या वेटलॉस आणि cosmatic सर्जरी बाबत मन मानेल ते लिहिलं गेलं, तिच्या पतीपत्नी मधील वोह असण्याबद्दल काही अतिहुशार आणि सर्वज्ञानी लोकांनी आपली अक्कल पाजळली. काय असतं ना अभिव्यक्ती आहे म्हणून आपण निरर्थक ,अर्थहीन , निराधार आणि अश्लील बोलत असू तर त्या बोलण्याला शून्य किंमत आहे.

तिकडे केरळात मधु नावाचा मनोरुग्ण आदिवासी तांदूळ चोरून जंगलात पळाला, त्याचा काही शहरी लोकांनी पाठलाग केला, त्याला पकडून जबर मारहाण केली. इतकं मारलं कि त्याने नंतर रक्ताच्या उलट्या करून प्राण सोडले. हे सगळं करताना त्यांनी व्हिडीओ शूट, सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. कुठून येतो इतका क्रूरपणा. तांदळासाठी माणसासारखा माणूस मारला जातो ,आपण स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजात रहातो असं कसं म्हणावं. जंगलं कमी होत असताना आदिवासींची कायमच दैना होत आलीय त्यातून जर असे प्रकार झाले तर नक्षलवाद फोफावणे अटळ आहे. ह्या ज्वलंत विषयावर खूप कमी लोक रिऍक्ट झाले. आपले इश्यू अशारितीने नॉनइश्यू बनतात हे एकंदरच घातक आहे.

तिकडे बिहारमध्ये एका SUV ने नऊ शाळकरी मुलं चिरडली गेलीत, आता ही गाडी एका राजकीय नेत्याची आहे म्हणे. गाडी कुणाची, कोण चालवत होतं ह्यावर उलटसुलट मतं येत आहेत, ह्याला पूर्ण राजकीय वळण दिलं जाईल. हा प्रकार तर इथे खुपजनांना माहितीही नसेल

एकाच कालावधीत घडलेल्या तीन दुर्घटना, पहिली घटना नैसर्गिक समजून हळहळ , प्रेम व्यक्त करून सोडून देता येईल पण इथेही वेळकाळ न बघता त्याची वाट लावूनच टाकली गेली. उरलेल्या दोन बद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे पण होईल असे वाटत नाही. सिनेमा, क्रिकेटच्या बाहेर आपल्या अभिव्यक्तीचा टक्का कधी वाढेल तो सुदिन. आपल्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण बोललं पाहिजे, बोलून काय उपयोग असं वाटत असेल तर मग सिनेमा ,क्रिकेटवर लिहिताना लेखण्या कशा सरसावतात. इतकं सहजसोपं बघायचं का जगाकडे, मग आपल्या गरजा पूर्ण झाल्या नाही तर बोलायचा अधिकार आपल्याला उरतो का? असो, इश्यू आणि नॉनइश्यू न समजणारा समाज कुठल्या दिशेने जाणार आहे कोण जाणे

Thursday, 22 February 2018

छद्मस्त्रीवाद

लोक शिव्या देतात. आई बहिणीवरून मिळणाऱ्या शिव्या मनाला टोचतात , ह्या शिव्या वर्मावर घाव घालतात म्हणून त्या तशा जास्त दिल्या जातात. लायकी काढायला बापावर शिव्या दिल्या जातात. काही लोकांच्या सहज बोलण्यातही शिव्या असतात त्यात फार गंभीर काही नसतं पण त्यांची जीभ रुळलेली असते. मी स्वतः पुण्यातल्या मोठ्या झोपडपट्टीच्या जवळच्या चौकात वाढलेय, रात्री अपरात्री रस्त्यावरून भांडण शिव्यांची लाखोली कानावर कायमच पडलेय पण मी आयुष्यात कधीही शिवी दिली नाही. मी आणि माझी भावंडं शिवी देऊच शकत नाही असं वळण आमच्या आईवडीलांनी आम्हाला लावलं. ह्या शिव्यावरून एक कविता सध्या viral झालीय आणि गावभर फिरतेय, मला ती कविता खटकली अजिबात आवडली नाही म्हणून ती कविता फॉरवर्ड करणाऱ्या दोन पोस्टवर मी खालील कमेंट्स केल्या नंतर त्या वॉलवर पोस्टही केल्या

1) टोचणाऱ्या, डसणाऱ्या , बोचणाऱ्या गोष्टींच्या आरपार बघता आलं पाहिजे म्हणजे जगणं शक्य होतं. त्याच्यावर रिऍक्ट होणं म्हणजे त्या गोष्टींचं महत्व वाढवणे, त्यांना ग्लोरिफाय करणे. Ignorance is bliss.

2) अश्लीलता, अर्वाच्यता ह्यांचा धिक्कार करताना त्याच अस्त्रांचा वापर केला तर ह्यात नक्की विजय कशाचा होतो. सभ्यता तिथे मान टाकतेच ना ?

शिवीला उत्तर शिवी कशी होऊ शकेल किंवा आईबहिणीवरून शिव्या द्यायला नकोत म्हणून स्त्रीवादी जहाल भाषेत लिहिताना अर्वाच्य भाषेत लिहितात हे माझ्या अजिबात पचनी पडलं नाही. एकूणच सध्याचा स्त्रीवाद माझ्या अकलेबाहेरचा आहे. स्त्रीसक्षमीकरणात आपण अजून मैलोगणती दूर असतात स्त्रीवादी स्मोकिंग, ड्रिंक्स आणि खुल्या शरीरसंबंधावर चर्चा करतात तेव्हा भंजाळून जायला होतं, मंजे त्यांनी तसं जरूर वागावं लिहावं पण ही आपली प्राथमिकता नाही. आपली प्राथमिकता स्त्रीभ्रूण हत्येचा विरोध, स्त्री शिक्षण, तिचा कुटुंबातील आणि समाजातील दर्जा उंचावणे ह्या पायऱ्यांवरून पुढे जायला हवाय असं माझं प्रामाणिक मत आहे. ह्या बेसिक गोष्टी सोडून तिला शारीरिक समाधान कसे मिळवायचे ह्याचे धडे देत बसणं मला अनाठायी आणि अनावश्यक वाटतं. एकंदरच सध्याचा एकूणच स्त्रीवाद भरकटला गेला आहे असं माझं म्हणणं अजिबात नाही, चांगल्या गोष्टीही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत पण दिसताना ह्या काही मोजक्या चुकीच्या गोष्टी समोर येतात कारण त्यात भपकेबाजपणा अधिक आहे. ग्राउंडलेव्हलवर काम करणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष असलं आकर्षक लिखाण करत नाहीत त्यांना तितका वेळ वाया घालवायचा नसतो. हे छद्मस्त्रीवादी निव्वळ आकर्षक , चमकदार लिहून एकूणच स्त्रीवादाविषयी चुकीचा समज समाजात पसरवायला कारणीभूत होतात असे माझं स्पष्ट मत आहे. होय मी ह्याला छद्मस्त्रीवाद किंवा स्युडोफिमिनिझम असंच म्हणतेय, कारण ते तसंच आहे.

Friday, 9 February 2018

कुटुंब व्यवस्थेवर स्वैर विचार

वाढत्या वयातले आणि विवाहबाह्य संबंध ह्यावर बरेच उहापोह होत असतात, हे संबंध अहितकारक आणि भावी पिढीच्या एकंदरच भावविश्वावर परिणाम करणारे असतात असं माझं स्वतःचं म्हणणं असताना अशा संबंधातील व्यक्तींच्या मनोव्यापाराचा मागोवा घेतला असता मला व्यक्तीशः त्यांच्याबद्दल कीव आणि दयाच वाटत आली आहे, घृणा वगैरे अजिबात वाटत नाही, मला जाणवलेले काही ठळक मुद्दे

1 बऱ्याचदा लग्नानंतर (ठरवून किंवा प्रेमविवाह)  आलेल्या जबाबदाऱ्या पेलता पेलता स्त्रीपुरुष दोघांचीही अवस्था आता उरलो मागच्या पिढीच्या सेवेकरता आणि पुढल्या पिढीच्या पालनापुरता अशी होऊन जाते. दाम्पत्याचे मनसोक्त जगणं, एकमेकांशी साध्या गप्पा, अधूनमधून फक्त स्वतःसाठी काढायचे क्षण दुर्मिळ होत जातात. आणि हे रितेपण शोधताना नजरा उंबरा ओलांडू लागतात

2 विवाहबाह्य किंवा ज्याला असामाजिक समजलं जातं अशा संबंधाचे कारण शारीरिक, मानसिक, बौद्धिक , काहीवेळा आर्थिक अतृप्तता असते त्याचं तुष्टीकरण जिथे होतं तिथे माणूस आपोआप खेचला जातो. ह्यात सहभागी दोन्ही व्यक्ती तारतम्याने वागणारी नसली कि त्यांचे संसार फाटलेच समजा, तारतम्याने वागणारे असतील तर त्यातल्या त्यात समाजमान्य रस्ते शोधले जातात किंवा स्वतःला आवर घातला जातो

3 विवाहानंतर काही नवरे डोमीनेटींग वागू लागतात, हरएक गोष्टीत त्याची परवानगी घ्यावी लागते. एक पैसा मनाने खर्च करायची सोय काही घरांत स्त्रियांना नाही, मोबाईल वापरू दिला जात नाही ; दिला तरी तो सतत तपासला जातो. काही ठिकाणी परिस्थिती उलटसुद्धा असू शकते, अशा नात्यात तिची आणि त्याची जीवघेणी फरफट सुरु होते. मुलांकडे बघून असे संसार रेटले जातात, त्यात ना आईबाप सुखी असतात ना मुलं. आईवडिलांचं आपसातील वागणं मुलांना दिसत असतं, समजत असतं त्यामुळे मुलंही चिडचिडी होतात

4 आपसात कितीही पटलं नाही तरी मुलांसाठी लग्न नावाचं जोखड मानेवर ठेवून खूप जण “सुखी संसार” करत असतात. आपली कुटुंबव्यवस्था अशी आहे की मुलांना आपण कायम जवळ बांधून ठेवतो. जनावरांची/ पक्ष्यांची पिलं पंखात बळ येईस्तोवर आईवडिलांना खेटून असतात, मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो पैसा कमावू लागला, त्याला मुलं झाली तरी आईवडील आणि मूल ह्यातले बंध सुटत नाहीत. आशियाई देशांत तर ही पद्धत आहेच. युरोप, अमेरिकेत मात्र मुलांना आर्थिक सक्षम करून त्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते, त्यामुळे त्या देशांत घटस्फोटाचा मुलांवर म्हणावा असा वाईट परिणाम होत नाही

5 कुटुंबव्यवस्था पूर्णपणे कर्तव्यावर बांधली गेली आहे ह्यात स्व ला स्थान नाही. घरातील मुलं आणि ज्येष्ठ ह्यांच्याप्रति आपली कर्तव्य उचलण्यात हयात जाते आणि हाच वसा पुढच्या पिढीच्या पदरात आपण देत जातो. अतृप्ती, असामाधान असेल तरीही त्याची पूर्तता करण्याचं धाडस फार कमी लोकांत असतं. हजारातला एखादा हा मार्ग पत्करतो, हा मार्ग योग्य कि अयोग्य हे आपण नाही सांगू शकत, दुसऱ्यांच्या गरजा चूक कि बरोबर हे आपण नाहीच ठरवू शकत. त्यांच्या ह्या रुळलेल्या वाटा सोडून जगण्याने पूर्ण कुटुंब उद्धवस्त होते हे मात्र खरे आहे. कुटुंबाचं पूर्ण भावविश्व ढासळून जातं. मन मारून जगणे हा एकमेव उत्तम मार्ग आहे, ह्याला त्याग असं गोंडस नाव देता येईल.

आर्थिक, भावनिक गुंत्यात सापडलेली मधली पिढी मन मानेल तसं नाही जगू शकत. जेष्ठांना सन्मानाने रहाता येतील अशी ओल्ड एज होम आणि लहानांना लवकरात लवकर स्वावलंबी करणे हा व्यावहारिक उपाय मधल्या पिढीला जरा मोकळा श्वास घेऊ देईल पण ह्याला मधली पिढी तयार आहे का?

Saturday, 16 December 2017

सैराटची ऐशीतैशी

#कुबेर_विनोदी_कथा_स्पर्धा

(नागराजअण्णांची माफी मागून आणि चार्लीला वंदन करून)

कथेचं नाव - सैराटची एैशी तैशी


एक छानसं, छोटंसं, टुमदार गाव होतं , इतकी विशेषणं लावलीत म्हणजे ते नक्कीच पुणे असणार हे अनुभवी लोकांना सांगणे न लगे...तर ह्या सुंदर सुंदर गावात तशीच एक छानशी हौसिंग सोसायटी होती, ह्या सोसायटीत आपली हिरोईन अर्चि आणि हिरो परश्या रहात होते. ह्यांची ही नावं त्यांच्या जन्मदात्यांनी जागतिक प्रसिद्धीचा सैराटनामक सिनेमा येण्याआधीच ठेवली होती आणि नंतर ती सिनेमातील मुख्य पात्रांना दिली गेली हा एक निव्वळ योगायोग होता. अर्चिचे पप्पा त्याना ती लहानपणापासून पप्पाच म्हणत होती , तर हे पप्पा महाचिकट मंजे कंजूस माणूस शेणातला पैसा उचलून धुवून वापरणारा, हे स्वतःच्या पैशाने चहा दूरची बात हॉटेलची पाटीसुद्धा वाचत नसत, अशा पप्पांना त्यांच्या एका मित्राने सैराट पिक्चर दाखवला आणि त्याने हे बरेच प्रेरित झाले. घरी आल्याआल्या त्यांनी लेकीला फर्माण सोडले “आरचे, तू आता मला पप्पा म्हणू नको तात्या म्हण. सैराटमधला तात्या बघितला का काय रुबाब आहे तात्या नावात” झालं अर्चिने रडायला सुरवात केली “तुला रडायला काय झालं आता, नुसतं तात्या म्हण म्हणलं तर मुंगी चावल्यासारखी काय रडायला लागलीस” अर्चिने रडत रडत डोळे पुसले “रडू नको तर काय, सैराटमध्ये तो तात्या अर्चिला मारतोSS वर प्रिन्सला ही मर्डरर बनवतो मला नको असले मारकुटे पप्पा” अर्चिने अजून गळा काढला ते ऐकून आतून आई गडबडीत बाहेर आली “काय गोंधळ लावलाय, जरा फेसपॅक लावावा म्हटलं तर झाला तुमचा गलका सुरू” “मम्मी फेसपॅक थोडा ज्यादा भिजव, माझ्याही गालावर पिंपल आलाय” अर्चि रडता रडता आरश्याकडे धावली “फेसपॅक कसला आणलाय , अरे देवा किती पैसे घालवले त्यात” पप्पाना म्हणजे भावी तात्यांना फेसपॅकच्या नावानेच घाम फुटला “विकत नाही हो आणला , मसूरडाळ मिक्सरमधून काढून दुधात भिजवली की झाला फेसपॅक. मेलं तुमच्यासारखा कंजूस नवरा असताना मी फेसपॅक विकत आणेन का? मला माझ्या सौभाग्याची काळजी आहे म्हटलं, बरं ही का रडतेय” आता अर्चिला आपलं आधीच रडणं आणि पप्पांना तात्याची आठवण आली “मम्मी तात्या मला पप्पा म्हण म्हणतायेत, मला नको असले पप्पा” गडबडीत अर्चिने पप्पा आणि तात्या उलटसुलट केले इकडे मम्मी चिंतेत,चिडून आणि आपलं ग्लॅमर अजून टिकून आहे ह्याचा नाही म्हटलं तरी थोडा आनंद ह्या संमिश्र भावात “कोण गं हा , माझ्या लेकीला पप्पा म्हण म्हणतोय” तशी अर्चिला आपली चूक समजली जीभ चावतच “सॉरी सॉरी , अगं पप्पा मला म्हणतात की तात्या म्हणून हाक मार म्हणून, तो सैराट बघून आले ना” तशी अंगावर पाल पडल्यासारखी आई ओरडली “आरचे तू अजिबात तात्या म्हणू नकोस, पप्पाच म्हण. तात्या म्हटलं की मला तो झपाटलेला तात्या विंचू आठवतो. माझा नवरा तात्या विंचू , ओ माँ माताजी चक्करच आली मला, डोळ्यापुढे अंधारीच आली माझ्या, आरचे मला धर,अहो SS” कुणाचं काय तर कुणाचं काय इथं आईचं वेगळंच सुरू झालं तशी अर्चि घाबरीघुबरी झाली “पप्पा, मी रिक्षा आणू का मम्मीला अंधारी आलीय” दाराकडे भराभरा निघालेल्या अर्चिला पप्पा ओरडले “अगं काही अंधारी आली नाही , तुझ्या आईच्या डोळ्यावर काळा गॉगल आहे आणि तिला वाटतंय चक्करच आली” तसा डोळ्यावरचा काळा गॉगल घाईने हटवत आई म्हटली “शी बाई ह्या घरात कुणाला माझी किंमतच नाही, चक्कर आली अंधारी आली तरी माझाच दोष, जळला मेला बायकांचा जन्म.” “पण मी म्हणतो घरात कुणी गॉगल घालतं का , जेव्हा बघावं तेव्हा नटून थटून बसलेला असता. त्या सिरियल्सनी बिघडवलं तुम्हाला, त्या बायका एक जरीच्या साड्या नेसून नुसत्या कटकारस्थानं करत असतात आणि ते बघून तुम्ही हे घरात गॉगल, जरीच्या साड्या आणि टिकल्या तर कसल्या हे एकेक बंदा रुपया जणू” पप्पा तावतावात भाषण मोडवर गेलेले बघून आईने तिथून काढता पाय घेतला आणि क्लासची वेळ झाली म्हणून अर्चिही पळाली.

ह्याच सोसायटीत दोन बिल्डिंग सोडून परश्या रहात असतो, त्याला अर्चि लई मंजे लई आवडायची पण सांगायची गोची. ही अर्चि त्या अर्चिसारखी स्मार्ट न्हवती हे आपलं एकदम बावळट ध्यान होतं. अर्चिला तू मला आवडतेस हे सांगायचं दूरच पण परश्या तिच्या समोरही जात नसे. रात्रंदिवस अर्चिचा विचार करू करू परश्या काट्यावर आला, एकेदिवशी आज साला काय व्हायचं ते होऊ दे कोर्टात जाऊदे अर्चिला सांगायचंच असं परश्यानं ठरवलंच पण च्यामारी तेवढी काय त्याला  डेअरिंग होईना म्हणून ब्रेकअपच्या आधीच आमचा हिरो देवदास झाला आणि सॅडमूडमध्ये त्याने मोबाईलवर गाणं लावलं कुठलं गाणं तर ते नै का एकदा ऐकलं तर दहावेळा ब्रेकअप झाल्याचा फिल येतो ते गाणं “ तेरी मेरी यू टी टूट गये सोनिये जैसे तुटिया अंबर दा तारा” अंबर शब्द आला कि दरवेळी परश्या छपराकडे बघायचा तिकडं काय दिसणार होतं ते त्यालाच माहीत. तितक्यात मोबाईल वाजला हा मेसेज खोलून बघतोय तर दोस्ताचा मेसेज “अर्चि कट्ट्यावर बसलीय” काय, कवा,कुठं पुढचे प्रश्न विचारे पर्यंत मित्र ऑफलाइन, परश्याचे मित्र एकेक कलंदर सैराटमधल्या मित्रांसारखे मार खाणारे न्हवतेच उलट ह्याला अजुन अडचणीत आणणारे होते तरी अर्चिचं नाव ऐकलं की ह्याने चढवले अंगावर कपडे आणि निघाला. अर्चि मस्त कट्ट्यावर मैत्रिणी गोळा करून बसली होती हातात पाचपन्नास राख्या, परश्या लांबूनच बघत होता हिचं काय सुरुये म्हणून. ही येणाऱ्या जाणाऱ्या पोरांना थांबवून राखी बांधत होती, “च्यामारी आज राखीपौर्णिमा आहे नाही का अन ही बया काय गावजेवण तसं गावराखीपौर्णिमा साजरी करतेय की काय. देवा मला वाचीव, हिच्या भावी मुलांचा मामा नाही पप्पा व्हायचंय रे मला” असं मनातल्या मनात बडबडत परश्या आल्या वाटेनं मागे गेला. मेसेज करणाऱ्या मित्राला फोनवर भोसडतच परश्या मागे फिरला.

अर्चिची लक्षण बघून , लक्षण म्हणजे ते हेच सार्वजनिक राखीपौर्णिमा वगैरे तर हे बघून पोरगी अरेंज मॅरेज करणार आणि आपल्याला खर्चापासून सुटका नाही हे तिच्या पप्पांना लक्षात आलं, तरी बापही कधी तरुण मुलगा असतोच त्यामुळे तरुणांच्या चाली त्यांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही. परश्याचा अर्चिकडे ओढा आहे हे पप्पांना समजलं तसं त्याना हर्षवायू व्हायचा बाकी राहिला. चांगला पोरगा बिनखर्चाचा मिळून जाईल, चप्पल झिजवणे, चहा पोहे , लग्न कितीतरी पैसा वाचेल फक्त पोरीने परश्याला हो म्हणायला हवं. काही दिवस गेले तरी पुढची हालचाल दिसेना एकदिवस न राहवून पप्पानी अर्चिला सांगितलंच “तुला करमत नसेल तर परश्याला बोलवत जा गप्पा मारायला, नाही म्हणजे आम्ही नव्या जमान्याचे आहोत आमची हरकत नाही मुलामुलींनी बोललं तरी” अर्चि आपल्याच नादात “करमतंय की मला, कंटाळा आला की मीच संगीकडे जाईन” “अरे वा, छान” मनातल्या मनात “धत 'तेरीकी” काही झालं तरी हे स्थळ जाता कामा नये आणि शक्य तितके पैसे वाचवायचे ठरवून पप्पांनी घराबाहेर घुटमळणाऱ्या परश्याला हटकलं इकडचं तिकडचं बोलताना थेट विचारलंच “इथे सारखा का फिरत असतोस” परश्या गडबडला “परत नाही येणार” म्हणून खाल्ल्या मानेन परश्या निघाला तसा “नै येत जा तू” घसा खाकरत पप्पा “घरात अर्चिशी बोलत बसला तरी चालेल, नाही त्याचं काय आहे तिचाही वेळ जाईल” पप्पांच्या ग्रीन सिग्नलचा परिणाम होऊन परश्या अर्चिच्या घरात येऊजाऊ लागला. हो नाही म्हणता म्हणता पप्पांच्या प्रयत्नाला आणि परश्याच्या प्रेमाला फळं लागली. अर्चि चक्क परश्याच्या प्रेमात पडली, तरी पप्पा आपल्याला काय समजतच नाही दिसतंच नाही असं समजून वागू लागले. एके दिवशी तिच्या मम्मीने विषय काढला “परश्याच्या घरी कधी जायचं बोलणी करायला” कळून सवरून आडाण्याचा आव आणून पप्पा म्हटले “काय, कशाला” “अहो अर्चि परश्या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला, त्यांचं प्रेम आहे “ अंगावर पाल पडल्यासारखे पप्पा “मी बोलणी करायला जाणार नाही, प्रेम आहे तर त्यांचं ते पळतील” जीभ चावून “अगं त्यांनी सांगू तर दे मला”. अर्चिपरश्याने दोघानीही आपआपल्या घरी एकदाची ही बातमी फोडली तशी पप्पा लटका नकार घेऊन बसले, परश्याच्या घरच्यांनीही मग ताणून धरलं. शेवटी वाट बघून दोघांनी आळंदीला जाऊन दोनाचे चार हात केले, तसं पप्पांना हुरूप आला आणि चारच दिवसात जंगी रिसेप्शन देऊन टाकलं. अर्चिची पाठवणी करताना डोळे पुसत पप्पा मनात विचार करत होते “नाही मी मुलीच्या सुखापुढे पैशाला महत्व देणारा बाप नाही पण सगळी सोंगं आणता येतात पैशाचं आणता येत नाही, चांगला मुलगा आहे त्यांनी लग्न करावं म्हणून मी किती प्रयत्न केले आता ऐपतीप्रमाणे मी रिसेप्शन करून दिलं” पाया पडणाऱ्या अर्चिला तोंड भरून आशीर्वाद दिला “सुखाचा संसार करा, अष्टपुत्रा भव” 

सुशीला

हि एक सत्यकथा आहे, नावं गाव बदलून लिहितेय. आजूबाजूला खूप विस्मयकारी प्रकार दिसलेले असतात ते लिहावे म्हणतेय. जमेल तसे भाग करून लिहितेय

----

#सुशीला

ओपीडी सुरु होऊन तास उलटला, शहरात राहिलेली शिकलेली निशा पहिलं पोस्टिंग मिळून ह्या आडगावात येऊन पडली होती. चहासाठी उठावं कि पुढचे पेशन्ट तपासावेत ह्या विचारात असतानाच निकम कम्पाऊंडर एका पंचवीशीतल्या तरुणीला घेऊन आत आला
“डॉक्टर मॅडम, हि आमच्या आळीत रहाते. आज सकाळीच न्हाणीघरात चक्कर येऊन पडली. बरं तर नशीब नाहीतर डोक्याला मार बीर लागला असता”
तिला तपासायच्या टेबलावर नेता नेता, निशा मनात विचार करत होती...ह्या गावात येऊन सहा महिने उलटले, गावातले म्हातारेकोतारे, तरणेताठे, लेकरं , बायाबापड्या जवळजवळ सगळे बघून झाले हिला कसं कुठं बघितलं नाही. तपासता तपासता निशा तिच्याशी बोलत होती
“सोबत कुणी आलंय का तुझ्या, तुझी सासू नवरा”
“संगट मामंजी आलेत, मालक घरात न्हाईत”
“गुड न्यूज आहे...म्हणजे चांगली बातमी, बहुतेक तुला दिवस राहिलेत. तीन चार महिने झाले असावेत. उद्या रक्त, लघवी तपासून घे बरं, गोळ्या औषध लिहून देते शेजारच्या मेडिकलमधून घ्या. रिपोर्ट दाखवायला उद्या ये”
हातातली चिठ्ठी चुरगाळत खाल मानेनं सुशीला बाहेर पडली. तशी निकमाना आवाज देत निशा म्हटली “मास्तर तास झाला, चहा द्या गरिबाला”. हातातला ट्रे समोर ठेऊन निकमही समोरच्या खुर्चीत टेकले. निशा इथं आल्यापासून निकमच तिचे केअरटेकर बनले होते, रिटायरमेंटला दीडवर्ष बाकी असलेला निकम मायाळू आणि पापभिरू भाबडा माणूस होता त्याच्या पोटी लेकरू नसल्यानं तो बाकीच्या मुलातच स्वतःला रमवायचा. 
“ती आत्ता गेली तिला दिवस राहिलेत बरका, तिच्या घरी कळवा”
निशाचं वाक्य ऐकून निकमचा चेहराच बदलला, निशाचं तिकडे लक्ष न्हवतं
“हि दिसली नाही कधी, घराबाहेर पडत नाही का, तसं गावही बदललाय हल्ली बायका घोळक्याने का होईना बाहेर पडतात”
“सुशीला घरातच असते, कुठं जात नाही. माहेर तुटलं तिचं, आई बाप आहेत तवर बाईला माहेर बघा. खाऊन पिऊन सुखी आहे तशी ती, आपल्या पुरुषोत्तमची बायको आहे ही, सांगतो तिच्या जावंला घरी जाता जाता” चहाचे कप ट्रेत गोळा करून निकम गेले आणि कंबर लचकवत, बायकी हावभाव करत चालणारा पुरुषांत नसलेला पुरुषोत्तम निशाच्या नजरेसमोर खटकन उभा राहिला. बऱ्याच अनाकलनीय गोष्टींचा उलगडा व्हायचा होता...पुढचा पेशंट बोलवायला निशाने बेल दाबली
...
रखमाच्या दारापुढं मांडव पडला होता , अगदी साधासा होता. रखमा रांडाव होऊनही दहावर्ष उलटून गेली होती. पदरात दोन लेकरं, मोठा मुलगा बाप असतानाच शिकून शहरात नोकरीला म्हणून जोे गेला तो तिकडचाच झाला. पोरानं मनानचं बायको केली एक मुलंही झालं , गावी आई बहिणीकडे ढुकुणबी बघना झाला. सणासुदीला आधी आधी यायचा तेबी आता येत नाही. पोराच्या पाठीवर आठ वर्षांनी झालेली मुलगी सुशीला दिसायला गोरीगोमटी पण शिक्षणात डोकंच नाही, तसंबी पोरीच्या जातीला डोकं असून काय फायदा, रुपडं चांगलं असल तर झटक्यात उजवून टाकता येती बघा. सोयऱ्यातच एकाने मागणं आणलं त्याच जागी सुशीलाचं लग्न पक्कं झालं. नवऱ्यामागे रखमाची शेती पडीक राहिली होती, दोघी दुसऱ्याच्या रानात कामं करून पोट भरत होत्या.लग्नात देणघेणं जमणारच न्हवतं तसंच मागणं आलं देव पावला म्हणून रखमा खुशीत होती. पोराला बोलवून घेतला होता, सख्ख्या बहिणीच्या लग्नात भाऊ नसला तर गाववाले तोंडात शेण घालतील म्हणून हातापाया पडून पोराला बोलवून घेतलं होतं, तो बी उपकार केल्यासारखा सकाळी आला अन सांजच्या गाडीने परत जातो ह्या बोलीवरच.

भर दुपारी बाराचं लग्न , आत नवरी नटून बसली होती. लै दिवसांनी सुशिलाच्या अंगावर चांगले कपडे होते. हळदी अंगाची, मेंदी रेखल्या हातांची, नवीन लाल जरतारी रुंद हिरव्या काठांची साडी अंगावर ल्यालेली सुशीला उठून दिसत होती. रस्त्यावर ढोलीबाजा वाजू लागला, नवरदेव घोड्यावर चढला, त्याचे आठ दहा दोस्त लोक धमाल नाचत होते. पोरांना नाचाची नशा चढली, बेभान होऊन नाचत होते. एका दोस्तानं गाडीत ठेवलेली फटाकी बाहेर काढली. सुतळी बॉम्ब दणक्यात वाजीवले, मोठ्या फटाक्यांची माळ चेतवली. जो जो फटाके वाजत तो तो नवरदेवाचं घोडं बिथरत होतं. एक मोठी माळ लागली अन घोड्याने जोरदार खिंकाळी मारून पाठीवरचा नवरदेव उडवला, हवेतून उडून जमिनीवर आदळलेल्या त्याच्या छाताडावर घोड्याचे पुढचे पाय आपटले तशी तोंडातून रक्ताची पिचकारी येऊन जागेवरच नवरदेवाचा खेळ आटपला. एका क्षणात वाजंत्री थांबली, सगळी पळापळ सुरु झाली. रखमाचं काळीज लक्कन हाललं, मोठ्याने बोंब मारून ती जागीच चक्कर येऊन कोसळली.

पांढऱ्या पायाची, लग्नाआधीच नवरा खाल्ला गं हिने , असं म्हणून न झालेल्या सासवा, नंदा, जावा सुशिलाच्या नावाने शिमगा करत होत्या. रखमा आता भानावर आली. लग्नाला आलेली माणसं पांगली. नवरदेवाला उचलून घेऊन गेले. लग्नाच्या मांडवाला पार सुतकी कळा आली. सुशीला आतमध्ये हबकून बसली होती, अंगावरचे कपडे बदलावेत कि काय करावं हेही तिला कळत न्हवतं. उंबऱ्यात डोक्याला हात लावून रखमा बसली होती, तोच पोरगा एका माणसाला घेऊन आला.
“आई, हे वऱ्हाडात आले होते, सुशी ह्यांना पसंत आहे. ह्यांचा मुलगा आहे लग्नाचा. आपण हो म्हटलं तर मुलाला घेऊन येतील, संध्याकाळी ह्याच मांडवात लग्न लावून देऊ”
“बरं बाबा, आणा म्हणावं पोराला. तसंबी आता हिचं दुसरीकडं जमणं अवघड झालं. खर्चापाणी पण परत झेपणार नाही”
“अगं काळजी नको करू, घरचं खूप चांगलं आहे. दोनच भाऊ आहेत , 15 एकर बागायती आहे. मोठ्या भावाचं लग्नही झालंय, माझ्यावर विश्वास ठेव”
त्याच मांडवात संध्याकाळी सुशीलाने पुरुषोत्तमच्या गळ्यात माळ घातली


निकम सांगत होते आणि निशा होऊन ऐकत होती, एखाद्या पेशंटमध्ये इतकं गुंतायला नकोय असं निशा स्वतःलाच सांगत होती पण तिच्या डोळ्यासमोरून सुशीलाच भांबावलेला चेहरा हटता हटत न्हवता.

...



शिलाच्या लग्नातला अजब प्रकार ऐकल्यापासून निशा अजूनच अस्वस्थ झाली. लग्नानंतर काय घडलं असावं ह्याचा तिला काहीही अंदाज करता येईना, निकमानाही त्यानंतरच्या घटना माहित न्हवत्या. सुशिलाबद्दल अधिक जाणून घ्यायची उर्मी तर निशाला फार वाटत होती. निशाने सुनीललाही हा प्रकार सांगितला तसा तो बिथरलाच
“तुला काय करायच्या नसत्या उठाठेवी , तू तुझं काम करत जा. नैतर तो जॉब सोडून इथे परत ये इथे तुझा दवाखाना सुरु कर” झालं घरूनच असा दम मिळाल्यावर निशाने सुशीला प्रकरण डोक्यातून काढून टाकलं पण नियतीच्या मनात अजून काही वेगळंच असावं, नियती नशीब तुम्हाला एखाद्या गोष्टी भोवती इतकं फिरवत ठेवते कि ठरवूनही कुणीच त्यातून बाहेर पडू शकत नाही. एका सुस्त दुपारी दवाखान्यात फारशी गर्दी नसताना बाहेर अचानक गलका उठला, धावपळ सुरू झाली. इमर्जन्सी दिसते म्हणून निशा झटकन खुर्चीतून उठली बघते तर बेशुद्ध सुशिलेला उचलून दोन लोक धावतच आले, एक तिचा नवरा पुरुषोत्तम होता आणि दुसरा तिचा सासरा होता. “डॉक्टर मॅडम, हिला तपासा सकाळधरून उलट्या जुलाब करतेय” सुशिलाला तपासून तिला सलाईन चढवलं गेलं , तिला फूड पॉइझनिंग झाल्याचा निशाचा अंदाज होता , सुशीलाच्या पोटाचा आकारही चांगलाच वाढला होता
“काय खाल्लंय हिने, जेवणात शिळं काही खाल्लं का”
“काय खाल्लं काय जनू आम्ही गडी लोक स्वयंपाक घरात कशाला डोकवतोय, तिकडं सगळं ह्याचंच राज्य. मनाला वाटल ते करून खात्यात”
आता मात्र निशाचा आवाज चढला “हे बघा , हा लहान दवाखाना आहे. इथे किरकोळ पेशन्ट ठेवतो आम्ही. दोन तासात फरक पडला नाही तर तालुक्याला न्यावं लागेल, तयारीत रहा. आणि तिने चुकून काही खाल्लं कि तिला मुद्दाम चारलं हेही बघावं लागेल, शंका आली तर पोलीस केस करावी लागेल”
“असं कुठं असतंय का, उलट्या जुलाब झाले म्हणून पोलीस केस. काय मॅडम गंमत करताय गरिबांची. नीट इथंच ईलाज करा कशाला तालुक्याला”
सुशीलाचा सासरा जरा गुर्मीत पण मानभावीपणाचा आव आणून बोलतोय अशी शंका न्हवे खात्रीच वाटत होती निशाला. आराम करायला स्वतःच्या रूमवर जायचा विचार रद्द करून निशा जातीने सुशिलाच्या वॉचवर होती. दोन तासात सुशिलाची पल्स नॉर्मलला यायला लागल्यावर निशाने तिला तालुक्याला पाठवायचा प्लॅन रद्द केला.
दुसऱ्या दिवशी सुशीला चांगलीच भानावर आली, पुरुषोत्तम तिची बऱ्यापैकी काळजी घेत होता. तिला उलटी आली तर भांडं धरत होता, तिच्या पाठीवरून हात फिरवताना त्याच्या डोळ्यातली माया जाणवत होती, पुरुषोत्तम सुशिलेला आणि सुशीला त्याला जीव लावते हे बघणाऱ्याला लगेचच जाणवत होतं. ओपीडी संपली तशी निशा सुशीलाला तपासायला गेली “आता आराम पडतोय ना, सुधारणा आहे परवा घरी जा. तुम्ही बायकाही अशा कशा गं, शिळं अन्न टाकावत नाही तर खाऊन घेता. परत असं करू नको”
अचानक सुशीला ढसाढसा रडायला लागली “डॉक्टरताई , पाया पडते मला घरी धाडू नका, मला परत ते पाला खाया घालतील. मला माझं बाळ पाहिजे. कायबी होऊंदे मी तुमची धुणीभांडी करीन” आता मात्र निशा आवाक झाली

...



(भाग 4)


#सुशीला

पुरुषोत्तम वयात येत होता तसं तसं त्याचं वेगळेपण सगळ्यांच्या ध्यानात येत होतं, गावात त्यांच्या घराला मान होता म्हणून उघड कुणी बोलत न्हवतं पण गुपचूप चर्चा होतच होती. नव्याचे नऊ दिवस सरले तशा ह्या चर्चाबी बंद झाल्या. गावात कुणी पावना आला तर तेवढ्यापुरता त्याने स्वतःहून विचारलं तरच सांगणं होत असे. तोही मनमिळावू होता, सगळ्यांना धावू धावू मदत करायचा त्यामुळं लोकांची त्याच्यावर मायाही होती. त्याची आई गेल्यावर भावाचं लग्न झालं त्याला एक मुलंही झालं आत्ता ह्याचं काय करावं ते त्याच्या बापाला समजेना. भाऊ तालुकाच्या गावी पंचायत समितीत कामाला होता, तिकडंच आठवडाभर रहायचा, घरची शेती बाप आणि पुरुषोत्तम बघायचे, शेतावर कामाला काही गडी माणसंपण ठेवली होती असं सगळं बैजवार चाललं होतं. पुरुषोत्तमच्या वयाच्या पोरांची लग्नं होऊ लागली होती, आता ह्याचं लग्न करायचं तरी कसं , करायचं का नाही ह्याविचारानी त्याचा बाप बेजार झाला. तशातच सुशिलाच्या लग्नातला प्रकार बघून बापाला आयडिया सुचली आणि पुरषोत्तमला पुढं घालून घेऊन आला नि बार उडवून दिला. काय नाही तर एखादी गरीब पोर मार्गी लागल, पुषोत्तमलाहि आधार होईल असा चांगला विचार करूनच बापानं हे पाऊल उचललं होतं.  सुशीला माप ओलांडून घरात आली, जावही प्रेमानं वागली, लग्नानंतरची पूजा, गोंधळ उरकला तशी पावनेरावळे पांगले. पुरुषोत्तम सुशिलेचा शब्द खाली पडू देत न्हवता ती म्हणल तसंच वागत होता, ईळभर घरात असलेला पुरुषोत्तम रात झाली की मळ्यावर झोपायला जात होता, रोज वेगळं कारण सांगून हातावर पाणी पडलं की पसार व्हायचा ते दुसऱ्या दिवशी च्या प्यायलाच हजर व्हायचा , सुशीला एकटी खोलीत असताना तो तिथं टिकतंच न्हवता. हि चुकामुक सुशिलाच्या लक्षात आली, आधीच त्याच्या हावभावावरून तिचं डोकं ठणकलं होतं त्यात हे, काही केल्या तो हाती लागतच न्हवता. आता काय करायचं , कुणाला सांगायचं सुशीला आतून नुसती धुमसत होती पण करायचं काय तिला समजत न्हवतं. लग्न झालं की मालक एक रात सुनी जाऊ देत नाहीत, त्याच्या रसभरीत कथा तिनं मैत्रिणीकडून ऐकल्या होत्या त्या आठवून सुशीला झुरु लागली. एक दिवस दुपारच्या जेवणाच्या भाकरी बांधून घेऊन सुशीला रानात गेली, आज हिकडं वर्दळ तशी कमीच रहाणार होती हे तिला ठाऊक होतं. खोपटात जेवण वाढून तिने नवऱ्याला हाक मारली , घाम पुसंतच तो आला सोबत एक गडीपण होता. नोकराला बघून सुशिलाच्या कपाळावर आठी चढली. नोकरमाणूस खाल मानेन जेवण उरकून पळाला तसा पुरुषाच्या तोंडात घास फिरू लागला. सुशीला मुद्दाम दार अडवून उभी होती,
“दार सोड जाऊ दे, रानात लई कामं पडलीत” त्याच्या चेहऱ्यावर ताण दिसतंच होता. खांद्यावरचा पदर पाडून सुशीला त्याला झोंबली, पुरुषाच्या तोंडावर मानेवर मटामटा मुकं घेऊ लागली, दोन्ही हातांनी त्याला घट्ट आवळून धरला. पुरुषोत्तमची ताकत तिच्यातून जास्त होती, त्याने जोर लावून तिला लांब ढकललं तशी भिताडाला आपटून सुशीला खाली पडली. कपाळावर मोठ्ठ टेंगुळ अन उभी रक्ताने न्हायलेली सुशीला त्वेषात त्याच्या अंगावर धावून गेली “असलं लक्षान व्हतं तर लगीन का केलं म्हणते मी, जन्माची नुकसानी झाली माझ्या, आता मी काय करू कुठं जाऊ” सुशीला मोठ्यानं गळा काढून रडू लागली तशी पुरुषाने तिच्या तोंडावर हात दाबला
“वरडू नको, माणसं गोळा व्हतील”
“होऊ दे कि, मी जगाला वरडून सांगणार हाय. फशिवलं मला” तिचे हुंदके सुरूच होते, पुरश्या मनातून कळवळला तिला जवळ घेऊन डोळे पुसताना त्याचेही डोळे भरले होते
“काय करणार आपणतरी, देवानं मला असंच घडवलं तुला माझ्या माझ्यामुळं तरास, माफी कर गं मला” अजूनच हमसत सुशीला रडत होती , घरात राहिलेली टोपी घ्यायला परत आलेला गडी सद्या खिडकीतून हे बघत होता.


दुसऱ्या दिवसापासून सद्याची वागणुक बदलली, उगाचच घराकडं येऊ लागला, सुशीला रानात आली की आजूबाजूला फिरू लागला. दिसायला सद्या देखण्यात जमा होता, आता त्याची रहाणीहि चांगली झाली. केसाचे कोंबडे काढून, गुळगुळीत दाढी केलेला सद्या मिशीला पीळ घालत सुशिलाच्या भवती फिरू लागला. भुकेली वाघीण ती , तिनेही हि खूण बरोब्बर हेरली, अन एका दिवशी दोघांना चान्स मिळाला तशी त्यांनी डाव साधला. एकदा तोंडाला रक्त लागलेली वाघीण अन शरीरसुखाची चव चाखलेली मादी तशी राहती व्हय. दुपार म्हणू नका, संध्याकाळ म्हणू नका सद्या अन सुशिलाचा खेळ रंगू लागला, पुरश्याला हि गोष्ट लक्षात आली पण तो काय करणार बिचारा उलट हे कुणाला कळू नये म्हणून पुरश्या राखण राहू लागला. रानातल्या खोपित सद्या अन सुशीला कपड्याचं भान विसरून एकमेकात रमले होते नि अचानक कुऱ्हाड हाती घेतलेला तिचा सासरा दाराला लाथ मारून आत घुसला तो शिव्या देतच
“भाडखाव, खाल्ल्या घरचे वाशे मोजताना लाज नाही वाटत. आमच्या टोपल्यातली भाकर खातो डुक्कर” हातातली कुऱ्हाड थोडक्यात नेम चुकन डोक्यावर यायची ती खांद्यावर बसली, हाताला लागतील तितके कपडे उचलून सद्या दारातल्या दैताला धक्का देऊन बाहेर पळाला. लुगडं कसंबसं गुंडाळत उभ्या राहिलेल्या सुशिलाच्या झिंज्या धरून “रांड साली, इतकी मस्ती आली व्हती तर आम्हाला सांगायचं चांगली जिरवली असती तुझी. घरात दोन दोन मर्द असताना बाहेर तोंड मारती शिंदळ, तुला दाखवतोच आता हिसका” फराफरा सुशिलाला ओढत घराकडं घेऊन गेला, तिच्या खोलीत तिला ढकलत “खबरदार कुणी आत आलं तर” असं ओरडतच सासरा म्हणणारा तिच्या अंगाला झोंबला. आरडाओरडा ऐकून धावत आलेली जाव चाललेला प्रकार बघून हबकून मागं फिरली. आपली भाकर आपणच खायची परक्याने तिला हात लावलाच कसा हा अजब तर्क असलेल्या सासऱ्याने सुनेबरोबर तोंड काळं केलं


सुशीला रडत तिची कर्मकथा ऐकवत होती, निशा खुर्चीत सुन्नपणे हे ऐकत होती “कसली गं हि लोकं, मुलीसारख्या स्त्रीवर हात टाकताना लाज कशी वाटत नाही म्हणते मी, ह्यांना माणूस तरी कसं म्हणायचं” निशाची फणफण सुरु झाली , मागे भीतीला टेकून उभे असलेले निकम आभाळाकडं बघून “श्रीहरी, विठूराया काय रे हे” असं पुटपुटत हळहळत होते

(दोन तीन ठिकाणी शिव्या लिहाव्या लागल्यात त्याबद्दल दिलगीर आहे, शक्य तितक्या मवाळ लिहिल्यात )


...

(भाग 5)

#सुशीला

आणि मग हे नेहमीचंच झालं, सुशीलाहि गप्प बसून होती. जावेला आपल्या नवऱ्याची काळजी आता तोही हिच्या कडे वळतो कि काय ह्या घोरानं जावेची झोप उडाली. आधीच तो घरी यायचा आठवड्यात दोन दिवस तेही जावेला जड जाऊ लागले, ती नवऱ्याला मिनिटभर एकटा सोडेना, ह्याला त्रासून त्याने तालुक्याच्या गावालाच बिऱ्हाड करायचं ठरवलं, आता इथं गावात सुशीला, पुरुषोत्तम आणि सासरेबुवा तीनच लोक उरले. एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं , सुशिलाला आता घरातच नजरकैदेत घातलं गेलं, उंबऱ्याबाहेर पडायची बंदीच आणली तिच्यावर. एकदोन महिने उलटले अन सुशीला गरोदर आहे ही खबर फुटली तशी हे पोर त्या सद्याचं असणार ते पाडून घे म्हणून सासरा तिच्या मागे हात धुवून लागला. आता मात्र सुशिलाच्या अंगातील रणचंडिका जागी झाली ती काही केल्या ह्या गोष्टीला तयार होईना. आता ही बया काही ऐकेना म्हटल्यावर तो बाबा पिसाळला अन जवळच्याच गावच्या एका वैदाकडन पोर पडायचा पाला मिळवला. सुशिलेला अगदी जबरदस्तीनं तो पाला तोंडात कोंबून चारला. त्या पाल्याने पोर काही पडलं नाही पण हिला उलट्या जुलाब सुरु झाले...हि अशी सगळी रामकथा ऐकून आता पुढं काय करावं हा मोठा प्रश्न निशापुढे ठाकला

“पोलिस बोलावते ते सरळ करतील ह्या नीच माणसाला, पण एक गोष्ट कळत नाही आईकडे किंवा भावाकडं जायचं सोडून हे का सहन करत राहिलीस”

“लगीन झालं नि तीन हप्त्यात रानात पान लागून आई गेली, भाऊ तो तसा आधी तरी कुठं बघत व्हता तवा आता बगल म्हणून आधाराला जावं. हिथ पोटाला आधार हाय, कपडालत्ता कशात कमी नाय. एक गोष्टीची कमी हाय पर तेबी चालतंय. हिथून भायेर पडले तर कुत्र्यावानी गत व्हईल माझी. मला माझं पोर पायजे पोरगा पोरगी जे काय असल ते. एवढं एकच कस जमतंय ते बघा तुमचे उपकार जिंदगीभर इसरणार नाय, तुमच्या पायात कातड्याचे जोडे करून घालीन बघा” सुशीला हमसून रडत होती

निशाने ताबडतोब त्या भागाच्या पोलीस चौकीत ह्याची तक्रार नोंदवली, सासऱ्याने जरा दबाव आणायचा प्रयत्न केला पण निशाने ठामपणे बाजू लावून धरली. अटक व्हायच्या भीतीने त्याने ह्यापुढं असं काही होणार नाही असं शपथपत्र लिहून देऊनच प्रकरण सामंजस्याने मिटलं. सुशिलाला वेळच्या वेळी एक छान दणदणीत मुलगा झाला, दिसायला अगदी आईसारखा तोंडवळा असलेला पोरगा पदरात बघून सुशीला हरकून गेली, तिच्या जिंदगीचं सार्थक झाल्यागत तिची अवस्था झाली होती. ते पोरगं चार महिन्यांचं झालं आणि निशा बदली घेऊन शहरात गेली, तिचा संसार तिची वाट बघत होता, निकमही रिटायर झाले. सगळी जिकडं तिकडं पांगापांग झाली, निकम आणि निशा अधूनमधून ख्यालीखुशाली विचारायला फोनवर बोलायचे नंतर नंतर तेही कमी झालं. जवळपास 6 वर्षांनी निकमांचा निशाला फोन आला, नातवाच्या लग्नाला आग्रहाने आमंत्रण देताना निकम हळवे झाले “हल्ली तब्येत साथ देत नाही, एकदा येऊन भेटून जा पोरी” ह्या लग्नाला जायचंच ठरवून निशा चार दिवसासाठी परत त्याच गावात आली. लग्न पार पडलं , जरा निवांतपणा आला तसे निकम तिला घेऊन फिरायला शेतावर गेले. चालताना वाटेल सुशीला आडवी आली, अंगात रंगतदार पाचवारी नेसलेली अंगात गच्च भरलेली बऱ्यापैकी बदललेली सुशीला बघून निशाला आनंद आणि आश्चर्यहि वाटले. दोघींच्या जुजबी गप्पा होऊन सुशीला निघून गेली, सुशीला गेली त्या दिशेला वळून बघत बघत नकळत निशा बोलून गेली
“किती बदल झाला ना हिच्यात”

“खरंय, सासरा गेला तशी हि मनाची मालक झाली. दीरजाव काही हिकडं चुकून बघेनात. पुरुषोत्तम गडीमाणसं हाताशी घेऊन शेती चांगली करतोय. घरात काही कमी नाही बघा, पोरगंबी आता शाळेत घातलंय. पण हिची जुनी सवय काय मोडना बघा, रानातले गडी अलगद उचलती बघा हि. हि सवय काय सुटेना हिची. अंगात मुरलय सगळं हिच्या त्याबिगर तिला जमत नाही. गावात बोलायची कुणाची टाप नाही इतका दरारा आहे हिचा आता, कुणी बोललाच तर त्याच्या दहापिढ्यांचा उद्धार करती. तीचीबी काय चूक आहे म्हणा , देवानं तिची गाठंच नामर्दाशी घालून दिल्यावर हि बाहेर उकिरडे फुकत फिरणारच ना”

“एक सांगा मास्तर , घरातल्या पुरुषाने तिच्यावर बळजबरी केली, पोर पडायचा प्रयत्न झाला तेव्हा ती किती अगतिक दिसत होती आणि आता ही उर्मट, रंगेल, स्वतःच्या मर्जीने पुरुष उपभोगणारी सुशीला किती मस्तवाल दिसतेय ना. तुम्हाला कोणतं रूप आवडलं हिचं”

गालातल्या गालात हसत निकम उद्गारले “मला आजची सुशीला आवडली पोरी”

#समाप्त

#स्वल्पविराम

(स्वल्पविराम अशासाठी कि ह्यापुढे अधूनमधून अशा कथा तुमच्यासमोर मांडत जाणार आहे. लिंकवर पूर्ण कथा वाचा)



Thursday, 14 December 2017

डोळे उघडा डोळे

चार आंधळ्यांची गोष्ट आठवते का, चार आंधळे म्हणजे ते खरोखर आंधळे नसतात तर भ्रमाची पट्टी डोळ्यावर बांधलेली असते. ज्याच्या हाताला सोंड लागतो तो वर्णन करतो "अहाहा, हत्ती म्हणजे लांबच्या लांब नळकांडं जणू" दुसरा कानाला कुरवाळून म्हणतो " हत्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एक हलतं डुलतं मोठच्या मोठं सूप आहे" तिसरा पाय पकडतो तो म्हणतो "हत्ती म्हणजे चालता बोलता खांब रे खांब" तर चौथ्याच्या हाती लागतं शेपूट त्याला वाटतं हत्ती म्हणजे निव्वळ एक फालतूसं खराटाछाप तोंड असलेला दोरीसारखा प्राणी. डोळ्यावरची पट्टी काढली कि त्यांना दिसलं अरेच्या आपण बघत होतो तो हत्तीचा एक छोटासा भाग होता. जवळ उभं राहून बघितलं तर पूर्ण हत्ती स्पष्ट दिसतंच न्हवता. जरा मागे सरकलं कि हत्तीचा अजून थोडा भाग दिसला, अजून लांब गेलं की हत्तीचा पन्नास टक्के भाग दिसला. हत्तीचा पूर्ण आवाका लक्षात यायला त्यांना अजून जरा लांब सरकावं लागलं.

कुठलीही परिस्थिती, माणूस , जनसमुदाय, संस्था किंवा इतरकाही पुर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर डोळ्यावरच्या पट्ट्या हटवून बघायला हवं, तटस्थपणे अवलोकन करायला हवं, गरज पडल्यास जरा दूर सरकून परिस्थितीचा पूर्ण आवाका लक्षात घ्यावा लागतो. जवळीक डोळ्यावर नाहीनाही त्या पट्ट्या बांधते त्याने सत्य आणि पूर्ण परिस्थितीचे आकलन होत नाही. याही पुढे जाऊन हत्ती खर्राखुर्रा कि भोंडल्यातला हे ओळखायचं असेल तर खूपसाऱ्या पट्ट्या सोडायला लागतील...डोळ्यावरच्या आणि मनावरच्या घट्ट पट्ट्या