आठवायला आधी विसरावं लागतं
खिशातल्या तुला जमेसही धरावं लागतं
आयुष्य अलगद कुस बदलताना
सुखाचा सावलीतही पोळावं लागतं
मुद्दल सगळी मोडीत काढताना
लपवलेल्या गल्ल्याला फोडावं लागतं
करताना बेरजा वजाबाक्या होत गेल्या
आता शून्याला पुन्हा गुणावं लागतं
येशील का स्वतः कधीतरी दारात माझ्या
तुझ्या वाटेवरचं दार अलगद लोटावं लागतं
जाणतोस ना नेहमीच घेतली माघार मी
जिंकण्यासाठी मात्र वादळाला भिडावं लागतं
गर्दीतल्या तुला खेचून आणणार पुन्हा मी
श्वासाला फुफ्फुसात खोल खोल कोंडावं लागतं
अलवार मिठीची , धुंद श्वासांची स्वप्नं बघताना
जगाच्या पटावर इज्जतीला मोडीत काढावं लागतं
#अर्चना
No comments:
Post a Comment