Tuesday, 19 September 2017

टेबल नंबर 21

एक तरुण जोडपं विवान आणि सिया , एक गेम शो जिंकून फिजी बेटावर ट्रिप बक्षीस मिळून लग्नाचा वाढदिवस साजरा करायला तिथे जातं आणि सुरू होते त्यांच्या आयुष्यात एक प्रचंड उलथापालथ. तिथे त्याना एक खान नावाचा माणूस भेटतो आणि विवान सियाला kbc च्या प्लॉटसारखा एक गेम ऑफर करतो. ह्या गेममध्ये तो ह्या दोघांना 21 प्रश्न विचारणार आणि प्रत्येक प्रश्नानंतर एक टास्क देणार, तो टास्क पूर्ण केला तर 1 कोटी रक्कम प्रत्येक स्टेपवर मिळत जाणार. 21 प्रश्न 21 कोटी रक्कम...विवान आणि सियाला भुरळ पडते आणि तिथंच ते फसतात. एकेका प्रश्नानंतर येणारे टास्क ह्या दोन  नवराबायकोकडून भयंकर गोष्टी करवून घेतात, बरं गेम मध्येच सोडायचा नाही हा नियम सगळीकडे नजर ठेवायला कॅमेरे आणि माणसं, पळूनही जाता येत नाही. ह्या टास्क मध्ये विवानने सियाचे केस कापणे, तिने त्याला मारणे, त्याने स्त्यावर तोडफोड करणे, तिने घाण खाणे अशी लई बेकार बेकार कामं करायला लावलीत.

शेवटचा टास्क म्हणून एक खून करायला विवान एका घरात जातो तर तिथे एक अर्धवट वेडा मुलगा असतो, त्याला बघून विवान सिया थक्क होतात आणि फ्लॅशबँक मध्ये आठवतात त्यांच्या कॉलेजचे दिवस. ज्याचा खून करायला हे तिथे आलेले असतात तो त्यांचा क्लासमेट असतो जो विवान सिया आणि गँगच्या रॅगिंगचा बळी असतो, त्याचं नाव अक्रम. रॅगिंग करताना जेजे विवान आणि सिया अक्रमकडून करून घेतात तेते सगळे टास्कच्या नावाखाली खान त्यांच्याकडून करवून घेतो. आता पश्चताप करून उपयोग नसतो अक्रम पूर्ण खचून वेडा झालेला असतो. मुलाची अवस्था बघून त्याचा बाप बदला तर घेतो पण त्याच्या पदरात काही पडत नाही तो हताश निराश. विवान आणि सिया स्वतःच्या चुका समजून लाजिरवाणी अवस्था झालेले...आणि पिक्चर संपतं

पिक्चरचं नाव टेबल नंबर 21, आर्टिकल 21 हा रॅगिंगविरोधी कायद्याचे कलम आहे

Sunday, 17 September 2017

वेदना

नका टोचू काट्यांनो
कातडी ही राठ नाही

झेलण्या दगडांना
हजर माझी पाठ नाही

छळतात सावल्याही
हल्ली त्यांची माझी गाठ नाही

आसवानी घेतले पाय मागे
त्याला त्यांची जाण नाही

तुझ्यासाठी जरी शून्य मी
हिशेब माझ्याविना पूर्ण नाही

अजुनी बघते वाट तुझी
जरी तुझा हा मार्ग नाही

Tuesday, 5 September 2017

भाऊ कदमचा गणपती



अप्रिय विषयावर लिहितेय कारण खूप उलटसुलट चर्चा वाचतेय, लॉजिकल पोस्ट खूपच कमी दिसतायेत, मी लॉजिकल लिहितेय असं माझं म्हणणं नाही पण मला जे वाटतंय ते लिहितेय. सगळ्यात आधी सांगणं म्हणजे कुणीही माझी जात शोधायला जाऊ नका मी सगळं सोडून बसलेय

1. पहिला मुद्दा भाऊ कदमने गणपती बसवला कदाचित श्रद्धेनं बसवला असेल किंवा तो व्यवसायाचा भाग म्हणून बसवला असेल. तो काम करतो त्या चॅनल्स तर्फे कलाकारांना तशा सूचना दिल्या जातात हे खुपजनांना माहीत आहे, नकार दिल्यास पुढे काम मिळणं अवघड होऊन बसतं हे सत्य आहे.

2. ज्या लोकांना भाऊने गणपती बसवला म्हणून संताप आला त्यांच्या प्रतिक्रिया सहाजिक होत्या. ज्या धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन तो धर्म सोडला त्याच धर्मातील गोष्टी 'आपला' माणूस करतो ह्याच्या यातना आणि त्यातून येणारी चीड आहे ती

3. बहिष्काराचा निषेध करणाऱ्या लोकांत प्रामाणिकपणे निषेध करणारे कमी आणि आता कसा तावडीत सापडलात म्हणून आनंदात पोस्ट टाकून उचकवणारे अधिक होते. ह्याच वेळी व्यक्तीस्वातंत्र्यचा आग्रह धरणाऱ्यानी हीच वर्तणूक कायम ठेवावी ही अपेक्षा

4. अतिशय त्रागा करून बहिष्कार, वाळीत टाकण्याची भाषा करणाऱ्यांनी आपण एरवी संविधानाचा पुरस्कार करतो हे ध्यानात ठेवावे आणि सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याबाबत आपली बांधीलकी विसरू नये. स्वधर्मि लोकांचे प्रबोधन करणे हाच एकमेव मार्ग तुमच्या समोर आहे

5. आपण जो धर्म सोडला त्यातील अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा याविषयी लिहिणं थांबवावे असा काही लोकांना सल्ला देऊ इच्छिते, कारण त्यामुळे कटुते शिवाय काही पदरात पडणार नाही. याबाबत काही लोक अतिशय टिंगल करणाऱ्या आणि थिल्लर पोस्ट लिहितात हे योग्य नाही, हे सोडून द्या

टीप - विषय माहीत नसल्यास कृपया चौकशी करू नये, उलटसुलट कमेंट्सला उत्तर देणार नाही. मी माझं म्हणणं लिहिलंय याउपर चर्चा नको. पटलं तर घ्या नाहीतर सोडा