असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
- ग्रेस
ग्रेसच्या कवितेतील या ओळी जीव कासावीस करायला पुरेशा ठरतात. रूढार्थाने मी स्वतःला नास्तिक समजते, कुठलंही कर्मकांड मी करत नाही. प्रश्न विचारणे , चिकित्सा करणे या सवयी अंगात मुरल्याने मला कुठलीच गोष्ट लवकर भुरळ घालू शकत नाही. या सगळ्याला अपवाद कृष्ण. का कुणास ठाऊक मला कृष्णाबद्दल कधीही चिकित्सा करावीशी वाटली नाही, वाटतंच नाही, मी त्याच्या प्रेमात आहे असं म्हणायला हरकत नाही
❤

महाभारत होऊन गेलंच नाही काल्पनिक गोष्टीवर कसं काय तुम्ही प्रेम करता असं म्हणायला माझा एक मित्र नक्कीच सरसावून येईल
☺ पण काल्पनिक तर काल्पनिक कृष्ण मला आवडतोच. सोळासहस्त्र स्त्रिया होत्या की शरीरातील नाड्या काहीही असेल त्याचा हा स्वामी, कर्ता करविता सगळं करून नामानिराळा कृष्ण. अत्यंत मुत्सद्दी युद्ध जिंकायला प्रयत्नांची शर्थ करणारा प्रसंगी कपटही करणारा कृष्ण मला प्रिय आहे. माझा स्वभाव तसा जरा तापटच मला राग आला की डोकं कामातून जातं पण कृष्ण आठवला कि मन आणि डोकं शांत होतं , हे असं का होतं याचं माझ्याकडे कसलंही स्पष्टीकरण नाही. राधेला मिळाला तो एकटाच असला तरी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तो मिळतोच मिळतो.

कृष्ण मला सगळीकडे दिसतो जाणवतो, मी ज्या ज्या व्यक्तीवर गोष्टीवर प्रेम करते त्यात मला तो दिसतो. कृष्ण मला सकाळच्या कोवळया उन्हात दिसतो, झाडाच्या पानात दिसतो, तो मला आल्हाददायक वाऱ्यात दिसतो, रिमझिम पावसात दिसतो. कृष्ण मला एखादया छानशा सुरेल गाण्यात ऐकता येतो. कृष्ण मला नवऱ्याच्या सरळसोट नाक आणि उंच कपाळात दिसतो, माझ्या मुलीच्या खळखळून आलेल्या हस्यात दिसतो.
कृष्ण मला सावळ्या रंगात दिसतो, कुरळ्या केसात दिसतो, टपोऱ्या तेजस्वी डोळ्यात दिसतो, कपाळावरच्या खुणेत दिसतो, शांत समंजस मौनात दिसतो, मनमोहून टाकणाऱ्या अर्धवट बोलात दिसतो, मुलांना जोजवणाऱ्या बापात दिसतो, प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसात दिसतो.
पानापानात दिसतो कान्हा... गं पानापानात दिसतो कान्हा..
ReplyDeleteकिंवा
मन वेडे रमतच नाही गं... मज कृष्ण भेटवा बाई गं.. मज कृष्ण भेटवा..
असंच ना...
छान लिहीता..
होय
Deleteमस्तच
ReplyDeleteखूपच छान , परखडपणे मांडलंय ताई
ReplyDelete