Sunday, 23 April 2017

अहिल्या

पंचकन्या मधील एक, ब्रम्हदेवाने स्वतः निर्माण केलेली जगातील सर्वात सुंदर स्त्री. उर्वशीला आपल्या सौन्दर्याचा गर्व झाला म्हणून तिच्याहून सुंदर स्त्री निर्माण करण्यासाठी अहिल्या बनवली गेली असाही उल्लेख आहे. अहिल्या अयोनीज समजली जाते म्हणजे ती जन्माला आली नाही तर तिला निर्माण केलं किंवा मूर्ती घडवतात तशी घडवली. तिच्या जन्माच्या वेगवेगळ्या कथा आहेत.

अहिल्या जगातील सर्वांग सुंदर स्त्री, ब्रम्हाने मोठी होईपर्यंत गौतम ऋषीला सांभाळ करायला दिली...गौतम ऋषीने ती वयात आल्यावर ब्रम्हदेवाच्या स्वाधीन केलं...ऋषींनी मुलीला नीट सांभाळले , सुखरूप परत केले म्हणून त्यांच्या नैतिकतेवर, नितीमत्तेवर खुश होऊन ब्रम्हदेवाने अहिल्येचा विवाह तिच्याहून वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या गौतम ऋषींशी करून दिला. जगातील सुंदरी आपल्यासाठीच निर्मिल्या जातात असा समज असलेला इंद्र या लग्नामुळे नाराज होतो आणि तप करण्यासाठी निबिड वनात निघून जातो.

अहिल्या आणि गौतम ऋषींच्या विवाहाबद्दल अजूनही एक कथा आहे ज्यात तिचा लहानपणी सांभाळ कुणी केला याबद्दल वरती उल्लेख केला तसंच आहे फक्त तिच्या विवाहासाठी ब्रम्हदेव एक पण ठेवतात , त्यांच्या पणानुसार जो तिन्ही लोकांना सर्वप्रथम फेरी मारेल तो अहिल्येला जिंकून घेईन. इंद्र आपल्या जादुई चमत्कार करून आधी पण पूर्ण करतात , दरम्यान नारद येऊन ब्रम्हदेवास सांगतात की इंद्राच्या आधी गौतम ऋषींनी पण पूर्ण केलाय आणि म्हणून अहिल्या त्यांनी जिंकली. गौतम ऋषींनी बछड्यास जन्म देत असलेल्या सुरभी गाईला फेरी मारली, गाईला प्रदक्षिणा म्हणजे तिन्ही लोकांना फेरा घातला अशी मान्यता असल्याने गौतम ऋषींनी पण जिंकला असं नारद सांगतात. कशाप्रकारे का असेना अहिल्याचा विवाह तिच्यापेक्षा वयाने खूप जास्त असलेल्या गौतम ऋषींशी झाला हे मात्र खरे आणि या विवाहाने इंद्राला मत्सर आणि क्रोधाग्नीत लोटले हेही खरेच. (गौतम ऋषी आणि अहिल्या यांच्यातील संबंध कसे होते हे मला कुठेही वाचायला मिळालं नाही)

लग्नानंतर अहिल्या गौतम ऋषींच्या आश्रमात राहू लागली जो एका नदीकाठी वसलेला होता (एक ठिकाणी मिथिलानगरीजवळ असा उल्लेख आहे). इंद्र अहिल्येच्या रूपाच्या पुरता वश होता, तिच्या जवळ जाण्याची तो संधीच बघत होता. एके दिवशी ऋषी आश्रमात नाहीत असं बघून तो गौतम ऋषींच्या रुपात अहिल्येसमोर हजर झाला. इंद्राने अहिल्येकडे शरीरसंबंध ठेवण्यासाठी मागणी केली आणि प्रेमाराधना केली. एव्हाना अहिल्येने समोर गौतम ऋषींच्या रुपात इंद्रदेव आहे हे ओळखले होतेच तरीही ती त्याला समर्पित झाली. काही कथांमध्ये अहिल्येने इंद्रास सुरवातीला नकार दिला परंतु देवांच्या इच्छेची तृप्ती करणे ही तिचे कर्तव्यच आहे असं सांगून इंद्राने तिचं मन वळवल्याचे सुद्धा सांगण्यात येतं. कशाही तऱ्हेने का असेना इंद्राने अहिल्येचा उपभोग घेतला हे मात्र सगळ्या कथांमध्ये मान्य केलं गेलंय. तिकडे गौतम ऋषींना सगळा प्रकार आंतरज्ञानाने समजतो आणि ते ताबडतोब आश्रमात येतात. अहिल्या आणि इंद्र यांच्या प्रणयाचं वर्णन वाचून एक गोष्ट लक्षात येते की इंद्राने तिच्यावर अत्याचार केले नाहीत. रतीसुखात दोघेही सारखेच सहभागी होते. त्या दोघांनीही रतीसुखाचा अपार आनंद उपभोगला इतका की शेवटी ते दमून थकून नदीच्या काठी झोपी गेले असाही उल्लेख आहे. गौतम ऋषी हे सगळं बघून ते अर्थातच संतप्त झाले आणि त्यांनी पळून जाणाऱ्या इंद्राला शाप दिला की तुझे दोन्ही वृषण कुचकामी होतील (या शापातून इंद्र कसा मुक्त झाला याची मला माहिती नाही) आणि अहिल्येला तू यापुढे जगाच्या नजरेस पडणार नाहीस एक गुमनाम होऊन म्हणजेच दगड होऊन पडशील असा शाप दिला त्यासोबतच श्रीराम जेव्हा तुला भेटतील तेव्हा तुझा उद्धार करतील असा उ:शाप दिला. अहिल्येला शतनंद नावाचा एक पुत्र झाला जे की नंतर मिथलेच्या दरबारी पुजारी होते.

आयुष्याच्या सुरवातीपासून कायम पुरुषी वर्चस्वाखाली राहिलेली अहिल्या फक्त एकदाच स्वतःच्या मनाप्रमाणे वागली आणि त्याचं फळ म्हणून तिला जगापासून दूर रहावं लागलं. उद्धार करायला पुन्हा एकवार पुरुषाचीच गरज लागली. तिने आयुष्य कुठे कंठावे, कुणासोबत विवाह करावा यात कधीही तिचं मत घेण्यात आलेलं नाही. एका दिवसाच्या आनंदाची मात्र जबरी किंमत तिला चुकवावी लागली. घरोघरच्या अहिल्यांबाबत अजूनही परिस्थिती तीच आहे इतका कशाचा पगडा समाजमनावर असावा बरं ?

(टीप - वेळोवेळी वाचलेल्या पौराणिक कथांचा आधार घेऊन वरील लिखाण लिहिलं आहे, याव्यतिरिक्त दुसरी माहितीही असू शकेल हे मला मान्य आहे)

Sunday, 16 April 2017

रणछोडदास

जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या दाराशी उभं आहे की काय अशी परिस्थिती आहे. जगातले जवळजवळ सगळेच पॉवरबाज नेते जहाल विचारसरणी बाळगून आहेत. युद्ध हे कधीही स्वागतार्ह नसतं, त्याचे परिणाम जेते आणि पराजित दोघांनाही सारखेच क्लेश देणारे असतात. आपला शेजारी सारख्या लहान मोठ्या कागळ्या करतच असतो तेव्हा आपले अतिउत्साही लोक आता ह्यांना धडा शिकवलाच पाहिजे म्हणून बाह्या सरसावून पोस्टि पाडत असतात. मी स्वतः हिंसेच्या विरोधात आहे पण तरीही गरज पडल्यास आपण सक्षम आणि सामर्थ्यवान असलंच पाहिजे याबद्दल माझं दुमत अजिबातच नाही. युद्ध नको आणि त्यामुळं होणारी अपरिमित हानी नको म्हणून श्रीकृष्णाने केलेले प्रयत्न कृष्ण शिष्टाई म्हणून ओळखले जातात, अर्थात त्याच्या प्रयत्नांना यश आलंच नाही त्याची निष्पत्ती म्हणून मोठा विनाश झाला. याआधी सुद्धा कृष्णाने युद्ध टाळण्यासाठी मथुरा सोडली होती आणि द्वारकेला मुक्काम हलवला होता,मथुरेतून पळ काढला त्यामुळे श्रीकृष्ण रणछोडदास म्हणूनही ओळखला जातो. श्रीकृष्ण माझा ऑल टाइम फेवरेट असण्यामागचं कारण हेहि आहेच, की तो नेहमी प्रॅक्टिकली वागत आला. अत्यंत मुत्सद्दीपणे जेव्हा जेव्हा जेजे योग्य ते त्याने केले. श्रीकृष्णाने केलेल्या जादुई गोष्टींकडे मी नेहमीच कानाडोळा करत आलेय त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. पण त्याच्या प्रॅक्टिकल , वेळच्या वेळी घेतलेल्या अचूक निर्णयाची तर मी अक्षरशः फॅन आहे. त्यातलाच एक निर्णय मथुरा सोडण्याचा.

तर त्याचं झालं असं, मगधराज जरासंध हा कंसाचा सासरा, कृष्णाने कंसाला मारल्यानंतर त्याच्या दोन्ही मुली अस्ति आणि प्राप्ती विधवा होतात, कंसाच्या वधाची बातमी ऐकून आणि आपल्या दोन्ही लेकींची अवस्था बघून जरासंध जाम खवळतो. कृष्णाला चांगलाच धडा शिकवायचा आणि यादववंशाचा नाश करायचा हा पक्का निर्धार जरासंध करतो. जरासंध मथुरेवर एकामागोमाग एक असे 17 हल्ले करतो. मथुरेची जिवीत आणि वित्त हानी चिक्कार होते. या हल्ल्याना तोंड देऊन यादवांचा खजिना रिक्त होऊ लागतो. जरासंधाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्धसामुग्री असते, यादवांकडे कृष्ण बलराम असूनही त्यांची ताकद कमी पडू लागते. अशातच एक दिवस मथुरेत निरोप येऊन धडकतो की जरासंध, छेदिनरेश दमघोष,  कुकुसेचा दत्वरका,  विदर्भराज रुक्मि,  अवंतीतील विंद आणि अरविंद हे भाऊ असे सगळे एकत्र झाले आहेत आणि यादववंश संपविण्यासाठी सज्ज झाले आहेत. हस्तिनापुराहून कसलीही मदत शक्य नसते. यादव एकटे पडतात म्हणजे एकटे पाडले जातात. मथुरानरेश उग्रसेन जे कृष्णाचे आजोबा असतात त्यांना जरासंध निरोप पाठवतो की फक्त कृष्ण बलराम आमच्या स्वाधीन करा मी या संकटातून तुम्हाला मुक्त करतो. उग्रसेन महाराज ही गोष्ट कृष्णाच्या कानावर घालतात. कृष्ण म्हणतो आपण मथुरा सोडून जाऊ. या परिस्थिती युद्ध करणं म्हणजे आत्मघात, यादवकुळ वाचवायचं असेल तर मथुरा सोडण्याशिवाय पर्याय नाही. उग्रसेन म्हणतात आपण जाऊ पण तुला पळपुटेपणा केला ह्याच खापर हा कलंक कायम घेऊन जगावं लागेल. कृष्ण म्हणतो मला पळपुटा म्हणू देत, रणांगणावरून युद्धाच्या आधीच पळालेला रणछोड समजू देत, मला आधीच असंख्य नावं आहेत, अजून त्यात एका नावाची भर.

जरासंधाची ताकद, त्यातुलनेत यादवांची दुर्बलता या गोष्टींमुळे कधीना कधी मथुरा सोडावी लागणार याचा कृष्णाला अंदाज होताच त्यामुळे त्याने विश्वकर्मा यांच्या कडून अगोदरच एक नगर बनवून घेतलं होतं ते म्हणजे द्वारका. द्वारका पाण्याखाली होती मग ती विश्वकर्माने वर आणली वगैरे गोष्टी सांगितल्या जातात ते असो. मथुरा सोडून सगळे यादव द्वारकेस निघून गेले, जरासंध आला तेव्हा त्याला मथुरेत काळं कुत्रंही दिसलं नाही. मथुरेतून पलायन केलं म्हणून श्रीकृष्णाला रणछोडदास हे नाव मिळालं ते मिळालंच , कृष्णाच्या इतर नावांप्रमाणे हे नावही गोड आणि सुंदरच आहे

(टीप- मी कुणी अभ्यासक नाही. इकडे तिकडे वाचलेलं आठवेल तसं माझ्या भाषेत लिहिलंय)

Friday, 7 April 2017

ढाल

जरा रगील होती जरा नशील होती
रंगीन इमारतही जरा घरंदाज होती

मोडून चौकटीना धावली सुसाट होती
गाडी पटरीवरून जरा उतरली होती

जरा कुलीन होती थोडी शालीन होती
चाल तिची जराजरा चवचाल होती

घट्ट लपेटल्या पदरात तेज आग होती
झाकून पाकून तरी अंतरात जाग होती

न्हवती दिनवानी कहाणी अपूर्ण होती
मोडल्या संसाराची खंबीर ढाल होती


Monday, 3 April 2017

भाव

ह्या फुलाचा गंध वेगळा
तू त्याला स्पर्श केला

आज नव्याने घडले काही
धडा तसा जुना वाचला

वाड्याचे खांबही तुटले
एक चिरा पुन्हा निखळला

आशावादाची राखरांगोळी
दिवा फडफडून विझला

तू म्हणाला दूर जाऊ
पसारा इथला मी आवरला

अश्रूंना किती टाळावे
गहिवर होता आत कोंडला

तुला वाटते मी बदलले
रंग तुझाहि बदलला

संसाराचे वस्त्र देखणे
अस्तराचा पोत विरला

कुणी कशावर किती मरावे
समजूनही जीव झुरला

जगी व्यर्थ सगळे नश्वर
तुक्याचा भाव तरला