मित्रा,
आपण मित्र आहोत ना रे, चांगले मित्र. स्त्री पुरुष मैत्री सत्य की भ्रम या वादात न पडता जमलेली, सजलेली आपल्या मैत्रीची भट्टी
कधीकधी असं होतं...हो होतं, आपण जातो मैत्रीच्या सीमा पार करून...कधी आल्याड कधी पल्याड...आणि परत परत स्थिरावतो मैत्रीच्या शाश्वत जमिनीवर
कचकून भांडतो आपण, रुसतो, फुगतो...चक्क बोलचाल बंद करून टाकतो...मग हळूच किलकिलं करतो दार, शोधतो एखादी फट आणि मागचं पाठी टाकून पुनश्च हरी ओम पुटपुटतो
मैत्री आहे म्हणजे नेमकं काय आहे आपल्यात ... कधीकधी दिवसदिवस आपण बोलत नाही, पण मन मोकळं करण्यासाठी साठवत रहातो खुपसारा पसारा आणि भेटलो की मन मोकळं करून टाकतो
तुला आठवतं का ? आपण भांडलो नि बोलणं बंद झालं पण तू जपलीस नात्याची प्रतिष्ठा आणि मीही जपली जीवापाड...तुझ्याबद्दलचा राग, लोभ, मोह मी काहीही माझ्या वागण्यात दिसू दिला न्हवता... वाटायचं चारचौघात थोबाडावा तुला पण मी असं करणार नाही आणि तुही असं करणार नाहीस याचा विश्वास होता तुला नि मला
वादळं येतील जातील, मैत्रीची घट्ट असलेली बंधनं कदाचित सैल होतील...जगात काही शाश्वत नसतं हे ठाऊक आहे मला...आपण दुरावलो तरी तुझ्या माझ्या नात्यातील सौन्दर्य जपून ठेऊ, कडवटपणा आणून त्याच्या ठिकऱ्या नाही होऊ द्यायच्या
मैत्रीचं रेशमी वस्त्र दोघेही जपून ठेऊ...खूप खूप वर्षांनी आठवू मग ह्या वस्त्राचा तलम स्पर्श...रंग गेलेलं, पोत विरलेली आठवण मागे टाकायची आपण आणि लक्षात ठेवायचा त्या रेशमाचा राजेशाही थाट
आज मी हे वचन देतेय तुला...कदाचित तू अशी कबुली देणारही नाहीस, नको देऊस...वचन न देताही हे सगळं न सांगता तू करशील हे माहीत आहे मला
तुझीच ,
#मैत्रीण
No comments:
Post a Comment